पुणे - रोज एका गावातून दुसऱया गावात संसार मांडून मेंढीपालन करणारे धनगर वाडे आता संकटात सापडत चालले आहे. शिरुर तालुक्यातील कवठेयमाई येथील माळराणावर मेंढ्यापालाच्या वाड्यावर रात्रीच्या सुमारास अचानक बिबट्याने हल्ला करत घोड्याचा फडशा पडल्याची घटना घडली आहे. यामध्ये मेंढपाळाचे ५० हजारांचे नुकसान झाले आहे.
खेड, आंबेगाव, जुन्नर, शिरुर तालुक्यात मेंढपाळ मेंढ्याच्या चाऱ्या-पाण्यासाठी वणवण भटकुन एका गावातुन दुस-यात गावात जाऊन शेत किंवा माळरानावर आपला संसार मांडतात मात्र आता हे मेंढ्यापाळांचे संसार बिबट्याच्या दहशतीमुळे संकटात सापडत चालले आहे.
गेल्या तीन महिन्यापुर्वी ओतुर येथे मेंढ्यापाळावर बिबट्याने हल्ला करत चिमुकल्या मुलीचा बळी घेतला होता तेव्हापासून मेंढपाळ धास्तावले होते, मात्र या संकटावर मात करण्यासाठी उपाययोजना करण्याची गरज असतानाही वनविभागाकडून ठोस उपाययोजना करत नसून, या ठिकाणी पिंजरा लावण्याचे आश्वासन दिले आहे. जंगलात वास्तव्य करणारा बिबट्या गेल्या अनेक दिवसांपासून ऊस शेतीला जंगल समजून लोकवस्तीत येऊन पाळीव प्राण्यांसह माणसांवर हल्ले करु लागला असताना आता या बिबट्याने मेंढ्यापाळाचा कळपच लक्ष करायला सुरवात केल्याने मेंढ्यापाळ धास्तावले आहे.