पुणे - सणसवाडी औद्योगिक क्षेत्रातील एका कंपनीत शनिवारी मोठी आग लागल्याची घटना घडली. सणसवाडीतील ब्राइट प्रायव्हेट लिमिटेड या फायबर मोल्डिंग कंपनीला ही आग लागली होती. या घटनेची माहिती मिळताच अग्निशामक दलाच्या सात ते आठ गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू होते. आग लागल्याचे समजताच कंपनीतील कर्मचाऱ्यांना तसेच परिसरातील नागरिकांना घटनास्थळापासून दूर जाण्यास सांगण्यात आले. प्राथमिक माहितीनुसार आग कंपनीतील एका बॉयलरला लागली आणि त्यानंतर इतर भागात पसरली.
कुठलीही जीवितहानी नाही
या आगीमुळे कंपनी परिसरात धुराचे प्रचंड लोट पाहायला मिळाले. ही आग इतकी मोठी होती की दुरून धुराचे प्रचंड लोट दिसत होते. या धुराच्या लोटांमुळे आगीवर नियंत्रण मिळण्यास सुरुवातीला अडथळा येत होता. आगीचे नेमके कारण काय याबाबत अद्याप स्पष्टता झालेली नाही. दरम्यान, आगीत कुठलीही जीवितहानी किंवा कुणाला इजा झालेली नाही. मात्र मालमत्तेचे मोठे नुकसान झाले आहे.