पुणे - कोरोनाची रुग्ण संख्या वाढत असल्यामुळे शहरातील रुग्णालयांवर ताण वाढला आहे. काही रुग्णालयात ऑक्सिजनचा तुटवडा निर्माण होऊन गंभीर स्वरूपाच्या घटना घडल्या आहेत. ऑक्सिजन तुटवड्याचा असाच एक प्रकार कोथरूडमधील कृष्णा हॉस्पिटलमध्ये घडला होता. मात्र, पोलिसांनी सतर्कता दाखवत वेळीच ऑक्सिजनचा पुरवठा केल्यामुळे वीस रुग्णांचे प्राण वाचले आहेत.
काय आहे घटना -
कोथरूड येथील कृष्णा हॉस्पिटलमध्ये 20 रुग्ण ऑक्सिजनवर आहेत. शनिवारी सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास कृष्णा हॉस्पिटल व्यवस्थापनाने कोथरूड पोलिसांना फोन करून 30 ते 45 मिनिटे पुरेल इतकाच ऑक्सिजनचा साठा असल्याचे सांगितले. इतर रूग्णालयात जागा नसल्यामुळे ऑक्सिजनवर असणाऱ्या रुग्णांना दुसऱ्या रुग्णालयातही हलविता येत नव्हते. घटनेचे गांभीर्य ओळखून कोथरुड पोलिसांनी तात्काळ ऑक्सिजन साठा मिळवण्याच्या दृष्टीने प्रयत्न सुरू केले. कोथरूड पोलीस ठाण्याच्या हद्दीत असणार्या रुग्णालयात धाव घेऊन पोलिसांनी त्यांना घटनेचे गांभीर्य आणि परिस्थितीची जाणीव करून दिली. त्यानंतर पोलिसांनी काही वेळातच सूर्यप्रभा रुग्णालय आणि सह्याद्री रुग्णालय यांच्याकडून ऑक्सिजनचे चार जम्बो सिलिंडर कृष्णा हॉस्पिटलला उपलब्ध करून दिले. त्यानंतर शिवाजीनगर येथून सिलेंडर आणण्यासाठी वाहन व क्रेन दिले. पोलिसांना केवळ एका तासाच्या आत कृष्णा हॉस्पिटलला पुरेसा ऑक्सिजन साठा उपलब्ध करून दिला.