पुणे - एल्गार परिषद आणि कोरेगाव भीमा हिंसाचार प्रकरणी अटक करण्यात आलेल्या 6 संशयित आरोपींचा जामीन अर्ज बुधवारी विशेष न्यायालयाने फेटाळला. विशेष न्यायाधीश एस. आर. नावंदर यांच्या न्यायालयाने हा निर्णय दिला.
सुरेंद्र गडलिंग, सुधीर ढवळे, महेश राऊत, शोमा सेन, रोना विल्सन आणि वरवरा राव यांचा जामीन अर्ज फेटाळण्यात आला आहे. सर्व संशयित आरोपी हे बंदी असलेल्या (माओवादी) संघटनेशी संबंधित आहेत. हे सर्व या संघटनेचे सक्रिय सदस्य असून, संघटनेचे ध्येय धोरणा पूर्ण करण्यासाठी काम करतात. हे लोकशाहीसाठी धोक्याचे असल्याचा निष्कर्ष काढत न्यायालयाने यांचा जामीन अर्ज फेटाळला आहे. सरकारी पक्षाच्या वतीने जिल्हा सरकारी वकील उज्ज्वला पवार यांनी बाजू मांडली.
जामीन अर्ज फेटाळताना हे मुद्दे घेतले विचारात :
- हे सर्व संशयित एकमेकांसह फोनवर संपर्कात होते. महेश राऊत यांच्याकडून जप्त करण्यात आलेल्या पत्रात, कोरेगाव भीमा येथील दंगलीसंदर्भात उल्लेख सापडला आहे.
- रोना विल्सन यांच्याकडे मिळालेल्या कागदपत्रात शस्त्र खरेदीचा उल्लेख मिळाला आहे. आत्मसर्पण केलेल्या पहाडसिंग या नक्षलवाद्याने पोलिसांना दिलेल्या जबाबात या सहा जणांच्या कामाबाबातची माहिती सांगितली आहे.
- सुरेंद्र गडलिंग यांनी प्रकाश यांना लिहिलेल्या पत्रात, ज्या ठिकाणी पोलिसांची संख्या कमी आहे, अशा ठिकाणी हल्ला करावे असे नमूद केले आहे. गडलिंग हे माओवादी संघटनेचे सक्रिय सदस्य आहेत.
- वरवरा राव यांच्याकडे मिळून आलेल्या कागदपत्रात माओवाद्यांच्या राजकीय आणि ध्येय धोरणांबाबत भाष्य केले सापडले आहेत. तसेच त्यांच्याकडून जप्त करण्यात आलेल्या पेन ड्राईव्हमध्ये शहरी भागातील नक्षलवादाचे काम आदी कागदपत्रे सापडले आहे.
या सर्व कागदपत्रांचा आणि पत्रांचा विचार करून जामीन अर्ज फेटाळला असल्याचे, न्यायालयाने आपल्या निर्णयात नमूद केले आहे. या प्रकरणातील पुढील सुनावणी 20 नोव्हेंबर रोजी होणार आहे.