पुणे - कोंढवा भिंत दुर्घटनेतील मजूर काम नसल्याने बिहारला परत जाणार होते. मात्र, बिल्डर पैसे देत नसल्याने ते थांबले असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. या घटनेतील मृत अवधूत सिंग यांचा मामा नारायण सिंग यांनी ही माहिती ईटीव्ही भारतशी बोलताना दिली.
कोंढव्यात कांचन कम्फर्ट इमारतीच्या विकासकाने मजुरांसाठी पत्र्याच्या खोल्या बांधल्या आहेत. शुक्रवारी मध्यरात्री २ वाजण्याच्या सुमारास या खोल्यांवर शेजारच्या इमारतीची संरक्षक भिंत कोसळली. भिंत मोठी असून कामगारांच्या खोल्या खड्ड्यात असल्याने मोठ्या प्रमाणात भिंतीचा मलबा पडला. यावेळी मजूर झोपेत असल्याने भिंतीच्या मलब्याखाली दबले. यामध्ये १५ कामगारांचा मृत्यू झाला. तर ३ कामगारांना जीवंत बाहेर काढण्यात राष्ट्रीय आपत्ती निवारण दलाच्या जवानांना यश आले आहे.
मृत मजुरांमधील अवधूत सिंग यांचे मामा नारायण सिंग पुण्यातल्या चाकण येथे कामाला आहेत. घटनेची माहिती मिळताच ते ससून रुग्णालयातील शवागारात आले होते. यावेळी त्यांनी ही माहिती दिली. गेल्या दीड महिन्यांपूर्वी अवधूत सिंग कामासाठी एकटाच पुण्यामध्ये आलेला होता. सध्या काम नसल्याने त्याला बिहारला परत जायचे होते. मात्र, बिल्डरने मजुरीचे पैसे दिले नव्हते. त्यासाठी ते थांबले असल्याचे त्याचे मामा नारायण म्हणाले. तसेच त्याचे वयोवृद्ध आईवडील, पत्नी आणि मुले गावाकडे आहेत. तसेच त्याच्या घरची परिस्थिती हलाखीची आहे. त्यामुळे आता त्याच्या कुटुंबाला या सरकारकडून मदत देण्यात यावी, असे नारायण म्हणाले.