पुणे - गणपतीची महाराष्ट्रातील प्रत्येक गावात एक-दोन मंदिरे हमखास पाहण्यास मिळतात. त्या मंदिरातून गणेशाची हजारो रूपे भाविक अनुभवतात. महाराष्ट्रातील या ‘आठ’ ठिकाणच्या गणेश मंदिरांना, मूर्तींना विशेष महत्त्व आहे. या आठ ठिकाणच्या गणपतीच्या मंदिरांना मिळून ‘अष्टविनायक’ म्हटले जाते. गणपतीच्या अनेक नावांपैकी एक नाव म्हणजे विनायक; म्हणूनच या मंदिरांचा संच म्हणजे अष्टविनायक. अष्टविनायकांची मंदिरे (स्थळे) महाराष्ट्रातच नव्हे, तर संपूर्ण भारतात प्रसिद्ध आहेत. अष्टविनायकातला सातवा गणपती म्हणजे ओझरचा विघ्नेश्वर. या ओझरच्या मंदिराचा इतिहास काय आहे, जाणून घेऊया.
१७८५मध्ये पेशव्यांनी बांधले होते मंदिर -
विघ्नेश्वर (ओझर) हे पुणे जिल्ह्यातील गणपतीचे मंदिर आहे. हे मंदिर अष्टविनायकांपैकी एक आहे. अष्टविनायकातला सातवा गणपती म्हणजे ओझरचा विघ्नेश्वर. या गणपतीला विघ्नेश्वर म्हणूनही ओळखले जाते. विघ्न म्हणजे कार्यात येणारी बाधा आणि हर म्हणजे दूर करणारा. १७८५मध्ये बाजीराव पेशव्यांचे भाऊ चिमाजी आप्पा यांनी हे मंंदिर बांधून त्यावर सोनेरी कळस चढविला. विघ्नेश्वराच्या मंदिराच्या पुढे २० फुट लांब सभागृह असून आतील गाभारा १० बाय १० फुटाचा आहे. मंदिराच्या कडेने मजबूत संरक्षक भींत आहे. येथील पूर्वाभिमुख मूर्तीच्या कपाळावर नाभीवर हिरे आहेत. मंदिराच्या चारही बाजूने दगडी तट आहे. मंदिराच्या आवारात दोन रेखीव दिपमाळा आहेत. मंदिराचे बांधकाम प्रेक्षणीय आहे. श्रींची मूर्ती डाव्या सोंडेची असून पूर्णाकृती आसनावर मांडी घातलेली आहे.
हेही वाचा - आज पाहणार आहोत गणपतीचे पाचवे नाव, ईटीव्ही भारत'वरील हा खास रिपोर्ट
हा आहे इतिहास -
इंद्राने यज्ञात विघ्न आणण्यासाठी विघ्नासूर राक्षसाची उत्पत्ती केली व त्याला यज्ञात विघ्न आणण्यास सांगितले. त्याने एक पायरी पुढे जाऊन सर्वच यज्ञांमध्ये विघ्न आणायला सुरवात केली. यामळे ऋषीमूनींनी विघ्नासूराचा बंदोबस्त करण्याची गणपतीला विनंती केली. गणपतीने पराभव केल्यानंतर विघ्नासूर गणपतीला शरण गेला. गणपतीने त्याला जेथे माझी पूजा केली जाते, तेथे न येण्याच्या अटीवर सोडून दिले. विघ्नासूराने गणपतीला विनंती केली की तुमचे नाव घेण्याआधी माझे नाव भक्तगणांती घ्यावे व तुम्ही येथेचे वास्तव्य करावे. विघ्नासूराची ही विनंती गणपतीने मान्य केली व तो या ठिकाणी विघ्नेश्वर या नावाने वास्तव्य करू लागला.
गणपतीच्या मुर्तीच्यावर शेषनाग -
या मंदिराच्या प्रवेशद्वारावर चार द्वारपाल आहेत. पहिल्या आणि चौथ्या द्वारपालाच्या हातात शिवलिंग आहे. गणपती त्याचे माता आणि पिता यांचा अतिशय आदर करतो. या द्वारपालांच्या हातातील शिवलिंग हेच सूचित करते की गणपतीच्या भक्तांनीसुद्धा स्वतःच्या आईवडिलांचा आदर राखला पाहिजे. मंदिराच्या भिंतींवर डोळ्यांना सुखावह वाटणारी सुंदर चित्रे आणि शिल्पे आहेत. देऊळ पूर्वाभिमुख असून त्याच्या सभोवती भक्कम दगडी भींत आहे. मंदिराचे शिखर आणि कळस सोनेरी आहेत. मंदिर २० फुट लांब असून मंदिराचा मुख्य हॉल १० फुट लांब आहे. पूर्वाभिमुख गणपतीची सोंड डावीकडे आहे आणि त्याचे डोळे माणिकाचे आहे. रिद्धी आणि सिद्धी यांच्या मुर्त्या गणपतीच्या आजूबाजूला आहेत. गणपतीच्या मुर्तीच्यावर शेषनाग आणि वास्तुपुरुष आहेत. देवळात लहान लहान खोल्या आहेत. यांना ओवऱ्या म्हणतात. इथे बसून भक्त ध्यान करू शकतात.
यंदाही साधेपणाने गणेशोत्सव साजरा -
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मंदिर बंद असून शासनाच्या नियमानुसार यंदाही गणेशोत्सव साध्या पद्धतीने साजरा होत आहे. विघ्नेश्वराने जगावर आलेले कोरोनाचे संकट लवकरात लवकर दूर करावे आणि पुन्हा सर्वाना आनंदाचे वातावरण द्यावे, अशी मागणी भक्तांकडून करण्यात येत आहे.
हेही वाचा - Ganeshotsav 2021 : असा आहे अष्टविनायकांपैकी एक असलेल्या लेण्याद्रीच्या गिरिजात्मकाचा इतिहास, वाचा....