पुणे - पुणे-सातारा महामार्गावरील खेड-शिवापूर टोलनाका महागला आहे. १ एप्रिल गुरुवारपासून दरात ३% ने वाढ करण्यात आली आहे. एनएचएआयने ही वाढ केली आहे. दरवर्षी एप्रिलमध्ये ही वाढ होत असते. त्यानुसार ही वाढ करण्यात आली आहे. ही दरवाढ पुढील एक वर्ष कायम असेल.
दरवाढीचे खिशावर परिणाम -
या दरवाढीमुळे आता कार आणि जीपच्या टोल दरात 5 रुपयांनी वाढ होणार आहे. यापूर्वी कार आणि जीप यासाठी 95 रुपये एका बाजूचा टोल होता, तो आता 100 रुपये झाला आहे. यासोबतच बस, ट्रक या वाहनांचे देखील टोल बदलले आहे.
दरम्यान, साडेदहा वर्षे अपूर्ण काम असलेल्या पुणे सातारा रस्त्यावर टोल दरात १ एप्रिल पासून 3% वाढ करण्याचा एनएचएआयचा हा निर्णय तुघलकी असल्याची टीका सजग नागरिक मंचचे अध्यक्ष विवेक वेलणकर यांनी केली आहे. काम पूर्ण न झाल्याने गेली दहा वर्षे अपघात, वाहतुक कोंडी, इंधनाची नासाडी सहन करणाऱ्या वाहनचालकांना त्यांच्या सहनशीलतेचे बक्षिस मिळाले आहे, असा टोला वेलणकर यांनी लगावला आहे. एकीकडे फास्टॅगमुळे टोल कलेक्शन वाढल्याचे ढोल वाजवले जात असताना ही दरवाढ कशासाठी? फास्टॅगमुळे टोल कलेक्शन वाढल्यामुळे लवकरच भारत टोलमुक्त होईल, या भ्रमात असणाऱ्या जनतेचे डोळे आता तरी उघडतील का असा सवाल विवेक वेलणकर यांनी केला आहे.
हेही वाचा - जीएसटी संकलनाचा आजपर्यंतचा उच्चांक; मार्चमध्ये 1.23 लाख कोटी जमा