पुणे - डोलदार डोक्यावरचा तुरा...तर लांबलचक पंखांचा पिसरा त्यातून उगवत्या सुर्याची साक्ष देत मोरांची आरोळी हे सारं मन सुन्न करुन टाकणारं असतं म्हणुन हा मोर देशाचा राष्ट्रीय पक्षी बनला. शिरुर तालुक्यातील खैरेवाडी या गावात प्रत्येक कुटुंबातील नागरिक आता या मोरांचे पालक बनुन मोरांचे संगोपन करु लागले आहेत.
सकाळी उगत्या सुर्याच्या आगमनात मोरांचा आवाज संपुर्ण परिसरात घुमतो. रमतगमत मोरांचे टोळगं लोकवस्तीत येत भटकंती करतात, डोंगरद-या व मोकळ्या माळरानांवर फिरत आपला चारा शोधत हे मोर दिवभर भटकंती करत असतात. त्यातच सद्या उन्हाचा पारा वाढल्यानं या मोरांचे जनजीवन धोक्यात आल्याचे गावाकरी सांगतात.
उन्हाळा आला की मोर आपला चारा शोधत लोकवस्ती व हिरवळ शेतीकडे जात असतात. दिवसभर सुंदर जंगलात फिरणारा हा पक्षी आता अन्नाच्या व्याकुळतेने लोकवस्तीत फिरत आहे. त्यात तो लोक वस्तीत येऊ लागल्याने नागरिकही त्यांना आपुलकीने स्विकारतात. मात्र मोरांचे आस्तित्व टिकवायचे असेल तर या मोरांना त्यांच्या मुळच्या ठिकाणीच अन्न-पाण्याची व्यवस्था करण्याची गरज आहे. तरच मोराचे आस्तिव ख-या अर्थाने टिकणार असल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे.
दुष्काळात होरपळत असणा-या या परिसराला मोरांच्या आस्तित्वाच एक वेगळं योगदान लाभलं आहे. या परिसरातील नागरिकही मोरांचे संगोपन अगदी आपल्या बाळाप्रमाणे करत आहेत. देशाचा राष्ट्रीय पक्षी असलेल्या या मोरांच्या उपजिविकेकडे शासनाकडुन दुर्लक्ष होत आहे.