पुणे - राज्यात सांगली आणि कोल्हापूर परिसरात महापूर आला आहे. या परिस्थितीत राजकारण न करता, सर्व राजकीय पक्ष आणि सामाजिक संघटनांनी एकत्र येऊन पूरग्रस्तांस मदत केली पाहिजे, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांनी केले आहे. या भागातील सर्व शेतकऱ्यांचे शंभर टक्के कर्ज माफ केले जावे, अशी आशादेखील शरद पवार यांनी यावेळी व्यक्त केली. सांगली,कोल्हापूरमध्ये निर्माण झालेल्या महापुराच्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर ते पुण्यात बोलत होते.
पवार म्हणाले, या महापुरामुळे शेती आणि पशुधनाचे मोठे नुकसान झाले आहे. पूर ओसरल्यानंतर खरी परिस्थिती समोर येईल. मात्र, सरकारने आता तातडीने पंचनामे करून मदत पुरवली पाहिजे. सांगली,कोल्हापूरमध्ये राजकीय लोकांनी फार गर्दी न करता इतर मार्गाने कशी मदत करता येईल ते पहावे. सरकारने सांगितल्यानंतर प्रशासन जोमाने कामाला लागत असते. मात्र, या महापुराच्या परिस्थितीत प्रशासन कमी पडत आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे खासदार,आमदार, पुण्यातील नगरसेवक यांनी एका महिन्याचे मानधन पूरग्रस्तांसाठी जाहीर केले आहे. महापूराचा परिणाम शेतीवर होईल. ही गोष्टी लक्षात घेऊन, या परिसरातली ऊस शेती आणि तिथल्या लोकांचे निरीक्षण करण्याच्या दृष्टीने 'वसंतदादा साखर संस्थे'च्या माध्यमातून 10 साखर तज्ज्ञांची एक समिती पूरग्रस्त भागात पाठवली जाईल, असे आश्वासनही पवार यांनी यावेळी दिले.
राष्ट्रवादी काँग्रेसकडून सुरू करण्यात आलेली 'शिव-स्वराज्य यात्रा' थांबवण्यात येत असल्याचेही शरद पवार यांनी यावेळी स्पष्ट केले. राष्ट्रवादी काँग्रेसच्या डॉक्टर सेलकडूनही मोठी मदत पूरग्रस्त भागात केली जाणार असल्याची माहिती त्यांनी दिली. अलमट्टी धरणातून पाणी सोडण्याच्या विषयावर बोलताना, या महापुरामुळे कर्नाटक आणि महाराष्ट्र राज्यात पुन्हा मतभेद निर्माण होण्याची शक्यता असल्याचे सांगत या प्रश्नावर खोलात जाऊन विचार करावा लागेल असे शरद पवार म्हणाले