पुणे - कात्रज-देहूरोड बाह्यवळण महामार्गासंबंधी खासदार सुप्रिया सुळे यांनी संसदेत प्रश्न उपस्थित केला आहे. या रस्त्याची काय स्थिती आहे, याचा आढावा ईटीव्ही भारतने घेतला. शहरात कात्रज देहूरोड बाह्यवळण महामार्गावरील नवले पूल, कात्रज बाह्यवळण हा भाग अपघातग्रस्त ठिकाण बनले आहे. या महामार्गावर नवले पुलाजवळ वाहतूक कोंडी ही नित्याचीच बाब झाली आहे.
मोठ्या प्रमाणात रहदारी, नव्या कात्रज बोगद्यापासून तीव्र उतार
पुण्याकडून साताऱ्याकडे जाणाऱ्या आणि साताऱ्याहून पुण्याकडे येणारी वाहतूक मोठ्या प्रमाणात आहे. त्यात नर्हे, आंबेगाव, वडगाव या भागातील स्थानिक वाहतुकीचीही भर पडत आहे. यामुळे हा भाग मोठ्या रहदारीचा बनला आहे. शिवाय, सातारा बाजूने पुण्यात येत असताना नव्या कात्रज बोगद्यापासून तीव्र उतार सुरू होत असल्याने दरी पुलावरून येणाऱ्या अवजड वाहनांमुळे होणारे जीवघेणे अपघात या ठिकाणी होत असतात.
वाहतूक कोंडी, रुंदीकरणाची कामे प्रलंबित
त्यात नवले पुलाजवळ होणारी वाहतूक कोंडी तसेच कात्रज बाजूकडे प्रलंबित राहिलेली रुंदीकरणाची कामे यामुळे दिवसेंदिवस या महामार्गावरील वाहतुकीची समस्या गंभीर बनली आहे. या रस्त्यावर अपघातांचे प्रमाण ज्यास्त आहे तीव्र उतारामुळे अनेकदा अवजड वाहनाच्या चालकाचा ताबा सुटून भीषण अपघात या भागात झालेले आहेत. सतत होणाऱ्या अपघातांमुळे नागरिक जीव मुठीत घेऊनच रस्त्यावर येत असतात, अशी स्थिती आहे. त्यामुळे या देहूरोडपासून दरी पुलापर्यंत या रस्त्यावर रुंदीकरण करणे, बाह्यवळण तयार करणे, यासारख्या कामांची मागणी स्थानिक प्रतिनिधी करत आहेत. या भागाच्या खासदार असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस नेत्या सुप्रिया सुळे यांनी सर्व अडचणी लक्षात घेऊन राष्ट्रीय रस्ते महामंडळ आणि केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्रालयाकडे पाठपुरावा केला आहे. त्यांनी राज्यसभेत प्रश्नोत्तराच्या तासादरम्यान हा प्रश्न उपस्थित केला.
रस्त्याचा प्रश्न लवकर सोडवण्याची नागरिकांची अपेक्षा
या परिसराचा हा प्रश्न आम्ही सातत्याने लावून धरत असल्याचे परिसरातील नगरसेवक सचिन दोडके सांगतात. यासाठी खासदार सुप्रिया सुळे यांनी राज्यसभेत उपस्थित केलेल्या मुद्द्यावर आता केंद्रीय मंत्रांनी दखल घेत या कामासाठी वेगळी निविदा काढली जाईल, असे आश्वासन दिल्याचे दोडके यांनी सांगितले. एकंदरीतच देहूरोड कात्रज बाह्यवळण रस्त्याचा हा प्रश्न लवकर सुटावा, अशी अपेक्षा परिसरातील नागरिक व्यक्त करत आहेत.