पुणे : विधान परिषद निवडणुकांनंतर आता पुण्यातील कसबा पोटनिवडणुकीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. गेल्या काही दिवसांपासून चर्चेत असणाऱ्या कसबा पेठ पोटनिवडणुकीसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. कसबाच्या भाजप आमदार मुक्ता टिळक यांचे कर्करोगाने निधन झाल्याने पोटनिवडणूक जाहीर करण्यात आली आहे. या पोटनिवडणूकीसाठी भाजपकडून हेमंत रासने तर महाविकास आघाडीने काँग्रेसचे रवींद्र धंगेकर यांना उमेदवारी दिली आहे.
कसबा मतदारसंघ : पुणे जिल्ह्यातील सर्वात जुन्या क्षेत्रांपैकी कसबा पेठ हा विधानसभा मतदारसंघ पुणे लोकसभा मतदारसंघातील आहे. हा मतदारसंघ कसबा म्हणूनही ओळखले जातो. या मतदारसंघाला 'हार्ट ऑफ पुणे सिटी' असेही संबोधले जाते. 1995 पासून या जागेवर भारतीय जनता पक्षाचा कब्जा आहे.
मतदारसंघावर भाजपचे वर्चस्व : पुण्याचे विद्यमान खासदार गिरीश बापट यांनी कसबा पेठ मतदारसंघाचे 25 वर्षे प्रतिनिधित्व केले. त्यांनी 1995 ते 2019 पर्यंत भाजप आमदार म्हणून कसबा मतदारसंघात बाजी मारली आहे. विधानसभा निवडणूक 2019 मध्ये भाजपच्या मुक्ता टिळक विजयी झाल्या होत्या. कसबा मतदारसंघात 1990 ते 2019 पर्यंत या मतदारसंघातून भाजपचे उमेदवार विजयी झाले आहेत.
असा आहे इतिहास : विधानसभेच्या या निवडणूकीत मुक्ता टिळक यांनी 75492 मते मिळवत कॉंग्रेसचे अरविंद शिंदे यांचा पराभव केला होता. तसेच महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2014 मध्ये कसबा मतदारसंघात भाजपचे गिरीश बापट यांनी कॉंग्रेसचे रोहित टिळक यांचा पराभव केला होता. यावेळी गिरीश बापट यांना 73594 तर रोहित टिळक यांना 31322 मते मिळाली होती. भाजपच्या विधानसभा निवडणूक लढण्याच्या इतिहास कसबा मतदारसंघ अव्वल मतदारसंघांपैकी एक आहे. 1962 मध्ये अपक्ष उमेदवार काळुराम उदानसिंग परदेशी यांनी मतदारसंघ विजय मिळवला होता. या मतदारसंघात 1962 ते 2019 पर्यंत एकूण 12 महिला उमेदवारांनी निवडणूक लढवली होती. कसबा मतदार संघाच्या इतिहासात १९६२ पासून ते आतापर्यंत मुक्ता शैलेश टिळक (भाजप) या एकमेव महिला उमेदवार विजयी झाल्या होत्या.
पोटनिवडणूकीसाठी मतदान व निकाल : भाजपच्या दिवंगत आमदार मुक्ता टिळक यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या कसबा पेठ विधानसभा मतदारसंघाची 2023 मध्ये पोटनिवडणूक जाहीर झाली होती. या पोटनिवडणूकीसाठी 26 फेब्रुवारी रोजी मतदान होणार असून निकाल 2 मार्च 2023 रोजी जाहीर होणार आहेत.
पोटनिवडणूक बिनविरोध करण्याचे आवाहन : भाजपने या निवडणुकीसाठी आपले उमेदवार घोषित केले आहेत. महाविकास आघाडीसुद्धा ही निवडणूक लढण्याच्या पूर्ण तयारीत असल्याचे दिसत आहे. अशा परिस्थितीत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी रविवारी महविकास आघाडीला एक पत्र लिहिले आहे. कसबा चिंचवड पोटनिवडणूक बिनविरोध कराव्यात राज ठाकरेंनी महाविकास आघाडीला केले आवाहन केले आहे.
मुक्ता टिळकांच्या निधनामुळे मतदारसंघाची जागा रिक्त : पुण्यातील कसबा मतदारसंघाच्या भाजपच्या आमदार मुक्ता टिळक यांचे वयाच्या 57 व्या वर्षी 22 डिसेंबर रोजी निधन झाले. गेल्या अनेक महिन्यांपासून त्या कर्करोगाशी झुंजत होत्या. पुण्यातील गॅलेक्सी केअर रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु होते. तिथेच त्यांनी अखेरचा श्वास घेतला. भाजपच्या प्रामाणिक कार्यकर्त्या, पक्षादेशाला त्यांनी नेहमी प्रमाण मानून राजकीय जीवनात काम केले. अगदी कर्करोगाशी झुंजत असताना त्यांनी व्हिलचेअर बसून मुंबईत येऊन राज्यसभा आणि विधान परिषद निवडणुकीकरिता मतदान केले होते. त्यांची कर्तव्यनिष्ठा पाहून अनेक जण भारावून गेले होते.
पोटनिवडणुकीचा कार्यक्रम
निवडणुकीची अधिसूचना जाहीर | 31 जानेवारी 2023 |
अर्ज दाखल करण्याची मुदत | 7 फेब्रुवारी 2023 |
अर्जांची छाननी | 8 फेब्रुवारी |
अर्ज मागे घेण्याची मुदत | 10 फेब्रुवारी |
मतदान | 27 फेब्रुवारी |
निकाल | 2 मार्च |
हेही वाचा : Kasba Bypoll : ...तरच भाजप आपला उमेदवार मागे घेईल; चंद्रशेखर बावनकुळेंचे मोठे विधान