पुणे : कसबा पेठ विधानसभा पोटनिवडणुकीच्या मतदानाला आज सकाळपासून सुरवात झाली आहे. आज सकाळी 7 ते 5 वाजेपर्यंत मतदान होणार आहे. सकाळपासूनच नागरिक आपला हक्क बजावण्यासाठी येत आहे. मतदानासाठी निवडणूक यंत्रणा सज्ज झाली आहे. प्रत्येक बूथवर मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त तैनात ठेवण्यात आला आहे. सकाळी 9 वाजेपर्यंत कसबा मतदार संघात 6 ते 5 टक्के मतदान झालेले आहे.
मीच मोठ्या मतधिक्याने निवडून येणार : गेल्या पंधरा वर्षापासून मी मतदार संघात नगरसेवक म्हणून काम करत आहे. स्थायी समितीचा अध्यक्ष असताना देखील मी या मतदार संघात अनेक विकास कामे केली आहे. आज सकाळी बाप्पाचा आशीर्वाद घेऊन मी जनतेचा आशीर्वाद घ्यायला निघालो आहे. देशाचे पंतप्रधान आणि राज्यात असलेले भाजप, शिवसेनेचे सरकार आणि झालेली विकास कामे यावर जनता मलाच या निवडणुकीत विजयी करणार आणि मीच मोठ्या मतधिक्याने निवडून येणार असल्याचे यावेळी रासने यांनी सांगितले.
नागरिकांची मतदानासाठी गर्दी : कसबा पेठ विधानसभा मतदार संघात आज सकाळी 7 वाजल्यापासून मतदानाला सुरवात झालेली आहे. या मतदार संघामध्ये एकूण २ लाख ७५ हजार ६७९ मतदार संख्या आहे. २७० मतदान केंद्रावर मतदान पार पडत आहे. २६ फेब्रुवारीच्या मतदान प्रक्रियेसाठी १ हजार २५० अधिकारी कर्मचाऱ्यांची नियुक्त करण्यात आली आहेत. मतदानासाठी प्रत्येकी १० याप्रमाणे २७ टेबलवर मतदान साहित्याचे वाटप करण्यात आलेले आहे. आज सकाळपासूनच मोठ्या संख्येने नागरिक हे मतदानाला आले आहेत. विविध बूथवर सकाळपासूनच नागरिकांनी मतदानासाठी गर्दी केलेली आहे. गेल्या काही दिवसांपासून वाढत असलेल्या उन्हाच्या चटक्यामुळे नागरिक सकाळच्या वेळेतच मतदान करत असल्याचे चित्र शहरात आहे.
दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला : कसबा पोटनिवडणुकीच्या निमित्ताने दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. भाजप उमेदवाराच्या प्रचारासाठी केंद्रीय मंत्र्यांपासून ते राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांनी प्रचार केला होता. भाजपने मोठी ताकद प्रचारात लावली होती. तर, दुसरीकडे महाविकास आघाडीचे अनेक दिग्गज नेत्यांनी प्रचारात सहभाग घेतल्याचे दिसले होते. दरम्यान, आज मतदार कोणाच्या पारड्यात मतदान करणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. आज बंदोबस्तासाठी 600 पोलीस कर्मचारी व 83 अधिकारी यांची नियुक्ती आहे. प्रत्येक ठिकाणी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला दिसत आहे.