पुणे : कसबा पोटनिवडणूकीच्या रणधुमाळीला सुरूवात झाली असून दोन्ही पक्षांकडून आरोप-प्रत्यारोपाला सुरूवात झाली आहे. अशातच भारतीय जनता पक्षाचे आमदार माधुरी मिसाळ यांनी देखील या निवडणूकीवर आत्ता आपले मत व्यक्त केले आहे. ते म्हणाले की, ही निवडणूक भाजप विरूद्ध काँग्रेस नव्हे तर हिंदुत्वविरुद्ध काँग्रेस आहे. काँग्रेस हा कायम हिंदुत्वापासून दूर राहिला आणि त्यांनी अपप्रचार केला. तसेच शिवसेनेने तर हिंदुत्वापासून फारकत घेतली आहे. त्यामुळे ही पोटनिवडणूक हिंदुत्व विरुद्ध काँगेस, अशी होणार असल्याचे यावेळी मिसाळ यांनी सांगितले.
पोटनिवडणूकीत विजय आमचाच: कसबा पोटनिवडणुकीत आमदार मुक्ता टिळक यांच्या निधनानंतर ही पोटनिवडणूक लागली आहे. या पोटनिवडणुकीसाठी भाजपकडून हेमंत रासने यांना उमेदवारी देण्यात आली आहे. प्रचाराच्या पहिल्या दिवसांपासून भाजपने यात आघाडी घेतली आहे. रासने यांनी निम्मा मतदार संघ फिरला आहे. आणि यात त्यांनी आघाडी घेतली आहे. आज आघाडीच्या बंडखोर उमेदवाराला उमेदवारी मागे घेण्यासाठी राहुल गांधी यांना फोन करावे लागत आहे. चिंचवडमध्ये तर उमेदवारी मागे घेता आलेली नाही. महाविकास आघाडीमध्ये सुरू असलेल्या अंतर्गत वादांमुळे सगळे एकत्र येताना दिसून येत नाही. त्यामुळे विजय आमचाच होणार असल्याचा विश्वास यावेळी मिसाळ यांनी व्यक्त केला.
प्रचारासाठी पत्रकार परिषद: भाजपच्यावतीने आज हेमंत रासने यांच्या प्रचारार्थ पुढील काळात होणाऱ्या सभा तसेच नियोजन याबाबत पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते. यावेळी शहराध्यक्ष जगदीश मुळीक, माजी महापौर मुरलीधर मोहोळ, माजी नगरसेवक धीरज घाटे आदी मान्यवर उपस्थित होते.
प्रचारसभेत हे नेते उपस्थित राहणार: पत्रकार परिषदेत पुण्याचे माजी महापौर मुरलीधर मोहोळ यांनी प्रचाराबाबत सांगितले. येत्या काळात भारतीय जनता पक्षाचे उमेदवार हेमंत रासने यांच्या प्रचारार्थ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, मंत्री गिरीश महाजन यांच्या सभा होणार असल्याची त्यांनी माहिती दिली आहे.
राष्ट्रवादी कॉंग्रेसचा आक्षेप: महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांच्या प्रचारार्थ आयोजित मेळाव्यात विरोधी पक्ष नेते अजित पवार हे भाषणाला उभे असताना गोंधळ निर्माण झाला होता. यावेळी भाजपचे उमेदवार हेमंत रासने यांची प्रचार रॅली आली तेव्हा भाजपच्या कार्यकर्त्यांकडून फटाके फोडून जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. यावर राष्ट्रवादीने आक्षेप घेतला आहे. यावर भाजप शहराध्यक्ष जगदीश मुळीक म्हणाले की, भारतीय जनता पक्ष हा सुसंस्कृत पक्ष असून जाणून बुजून आमचे कार्यकर्ते असे कृत कधीच करणार नाही. राष्ट्रवादीकडून अश्या पद्धतीचा अपप्रचार सुरू असल्याचे यावेळी मुळीक यांनी सांगितले.
हेही वाचा: Pandurang Sakpal : ठाकरे गटात खांदेपालट! पांडुरंग सकपाळ यांना विभाग प्रमुख पदावरून हटवले