पुणे - महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर या केवळ स्टंटबाजी करीत आहेत. त्यांना खरोखरच काम करायचे आहे तर माजी मंत्री संजय राठोड यांच्या विरोधात गुन्हा दाखल करून दाखवावा, असे आव्हान शिवशक्ती सेना पक्षाच्या अध्यक्षा करूणा मुंडे यांनी केले आहे. मुंडे म्हणाल्या, ‘‘ट्विट करून स्टंटबाजी करण्यापेक्षा संजय राठोडसारख्या राजकारण्यांवर कारवाई करण्याचे धाडस चाकणकर यांनी दाखविले पाहिजे. माजी मंत्री संजय राठोड यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला तरच शक्ती कायदा अंमलात आल्याचे लोकांना समजेल. महिला आयोगाच्या अध्यक्ष म्हणून संजय राठोड यांच्याविरोधात कारवाई झाली पाहिजे यासाठी चाकणकर यांनी पुढाकार घेतला पाहिजे", असेही त्या म्हणाल्या.
...तो माझ्यासाठी न्यायाचा दिवस असेल -
माझ्यावर झालेल्या अन्यायाच्या विरोधात मी लढत आहे. मी न्याय नक्कीच मिळविणार आहे. मात्र, कार्यकर्त्यांना पाठिंबा देण्यासाठी, त्यांना पुढे नेण्यासाठी सध्या मी काम करीत आहे. त्यासाठी पक्षाची स्थापना केली आहे. येत्या निवडणुकीत गरज पडली तर परळी विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढविण्याची माझी तयारी आहे. नवरा विरूद्ध बायको अशी ती लढत होऊ शकेल, असे मुंडे यांनी सांगितले. न्यायासाठी गेल्या वर्षभरापासून मी झगडत आहे. जेव्हा माझे पती मला माध्यमातून म्हणतील की, मी हरलो तू जिंकलीस. तो माझ्यासाठी न्याय असेल. समाजिक न्यायमंत्री धंजय मुंडे यांच्याबरोबर असलेले भांडण वेगळे असून ‘पिक्चर अभी बाकी है’ असे सांगत या विषयावर अधिक बोलण्याचे त्यांनी टाळले. पक्ष उभा करताना कार्यकर्ता महत्वाचा असतो. उद्या माझा मुलगा जरी राजकारणात आला तरी आधी कार्यकर्ता म्हणून काम कर असं मी त्याला सांगेन, असे मुंडे यांनी स्पष्ट केले.
पक्ष स्थापन केल्यानंतर कार्यकर्ते एकत्र येत आहेत. सर्व स्तरातून मला पाठिंबा मिळत आहे. राज्यात सर्वत्र काम सुरू असून बचत गटाच्या माध्यमातून स्त्रियांसांठी काम करणार आहे. पुणे महापालिकेच्या निवडणुकीत सर्व जागा माझा पक्ष लढवणार असल्याचे त्यांना स्पष्ट केले. अब राजा का बेटा राजा नही बनेगा, हाच अजेंडा समोर ठेवून आगामी निवडणुकांसाठी शिव शक्ती सेनेच्या करुणा धनंजय मुंडे सज्ज झाल्या आहे. त्यांनी ईटीव्ही भारतशी केलेली ही बातचीत...