पुणे - राज्याचे लक्ष लागलेल्या बारामती लोकसभा मतदारसंघातील भाजपच्या उमेदवार कांचन कुल यांनी मंगळवारी उमेदवारी अर्ज सादर केला. यावेळी, बारामतीमध्ये परिवर्तन निश्चितपणे होणार आहे. तापलेले राजकीय वातावरण 'कुल' करण्यासाठी बारामतीत कुलच पाहिजेत, असा टोलाही त्यांनी विरोधकांना लगावला. यावेळी महायुतीच्या कार्यकर्त्यांनी कांचन कुल यांच्या समर्थनार्थ गर्दी केली होती.
उमेदवारी अर्ज भरताना भारतीय जनता पक्षाचे नेते चंद्रकांत पाटील, पुणे लोकसभा मतदार संघातील उमेदवार गिरीश बापट, शिवसेनेचे नेते विजय शिवतारे आणि नीलम गोरे आदी नेते उपस्थिती होते.
यासंदर्भात प्रतिक्रिया देताना कांचन कुल म्हणाल्या, यंदा मतदारांनी आपणच उमेदवार आहोत, असे म्हणून काम करण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे बारामतीत परिवर्तन निश्चितपणे होणार आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस आणि पवार कुटुंबीयांसाठी बारामती लोकसभा मतदारसंघ प्रतिष्ठेचा मानला जातो. दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कांचन कूल यांना उमेदवारी देऊन सुप्रिया सुळे यांच्यासमोर आव्हान निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे सुप्रिया सुळे आणि कांचन कुल यांच्यातील सामना अटीतटीचा होणार असल्याचे चित्र आहे.