पुणे- मागील काही दिवसांपासून राज्यात सुरू असलेल्या अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका शेतकऱ्यांना बसला आहे. राज्यातील 13 जिल्ह्यातील अंदाजे 2 लाख 1,496 हेक्टरमधील पिकांचे नुकसान झाले आहे. सर्वाधिक नुकसान कोल्हापूर विभागातील सातारा, सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यात झाले आहे. या तीन जिल्ह्यातील 1 लाख 12 हजार हेक्टर जमीन पाण्याखाली गेली आहे. ज्या शेतकऱ्यांच्या फळबागा पूरात वाहून गेल्या अशा सर्व शेतकऱ्यांना सर्वतोपरी मदत केली जाईल, असे आश्वासन रोजगार हमी व फलोत्पादन मंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी पत्रकार परिषदेत दिली.
अतिवृष्टीमुळे निर्माण झालेल्या या आपत्तीत सर्वाधिक नुकसान कोल्हापूर जिल्ह्यातील 12 तालुक्यात झाले. या तालुक्यातील 68 हजार 610 हेक्टरवरील पिके पाण्याखाली गेली आहेत. यामध्ये भात, नाचणी, बाजरी, भुईमूग, सोयाबीन, ऊस व भाजीपाला या पिकांचा समावेश आहे. त्याखालोखाल सातारा जिल्ह्यातील 9 तालुक्यातील 23 हजार 116 हेक्टरवरील पिके पाण्याखाली गेली आहेत. सांगली जिल्ह्यातील 20 हजार 571 हेक्टर जमीन पाण्याखाली गेली आहे. या तीनही जिल्ह्यातील शेतकऱ्यांना नव्याने फळबागा लागवडीसाठी सर्वतोपरी आर्थिक मदत केली जाईल, असे जयदत्त क्षीरसागर यांनी स्पष्ट केले. याशिवाय पुणे विभागातील पुणे, सोलापूर आणि अहमदनगर या तीन जिल्ह्यातील अंदाजे 24 हजार हेक्टरमधील पिके पाण्याखाली गेली आहेत. यामध्ये सोयाबीन, भात, भुईमूग, ऊस, केळी, पेरू, कडधान्य आदी पिकांचा समावेश आहे.