पुणे : महाविकास आघाडीचे सरकार असताना आपण राज्यात साडेसहा हजार कोटींची गुंतवणूक या राज्यात आणली.पण जेव्हा पासून राज्यात गद्दारांची सरकार आली आहे.तेव्हा त्यांनी राज्यातील अनेक प्रकल्प हे गुजरातला पाठवले आहे. मला कधी कधी हाच प्रश्न येतो की राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे या राज्याचे मुख्यमंत्री आहे की गुजरात चे मुख्यमंत्री आहे. पण ते मला सांगतात की आदित्य असे बोलू नको मी महाराष्ट्राचे ही मुख्यमंत्री नाही, गुजरात च ही मुख्यमंत्री नाही. मला दिल्लीवाले बोलणार मी तिथे जाणार अशी जोरदार टिका युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी केली आहे.
एक सीएम आहे तर, दुसरे सुपर सीएम : कसबा पोटनिवडणुकीत महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांच्या प्रचारार्थ पुण्यातील नाना पेठ येथील साखळीपीर येथे माजी मंत्री आदित्य ठाकरे,खासदार श्रीनिवास पाटील, माजी मंत्री सुनील केदार यांची जाहीर सभा ठेवण्यात आली होती. यावेळी ते बोलत होते. यावेळी आदित्य ठाकरे पुढे म्हणाले की, या सरकारमध्ये एक सीएम आहे तर, दुसरे सुपर सीएम आहे. कधी हे सही करत नाही तर कधी ते सही करत नाही. मरण आमच्या चाळीस आमदारांचे झाले आहे. तिकडे गेले, त्यांना वाटलं मंत्री होऊ, लाल दिवा घेऊन फिरू,अस वाटले होते.
गाजर वाटपाच कार्यक्रम : पण कोणालाही काहीही मिळालेले नाही. मी त्यांना म्हटल की, तुम्ही परत विस्ताराच विमान पकडा आणि पुन्हा गोवाहटीला जा. सध्या गाजर वाटपाच कार्यक्रम हा जोरदार सुरू आहे. अशी टीका देखील यावेळी आदित्य ठाकरे यांनी केली. मी याआधी देखील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना चॅलेंज केले आहे. तुम्ही माझ्या मतदारसंघातून म्हणजेच वरळी येथे निवडणूक लढवावी आत्ता पुन्हा त्यांना मी चॅलेंज करत आहे की, थेट ठाण्यातून त्यांनी माझ्याविरोधात निवडणूक लढवावी. कारण ठाण्यातील जनता ही आमच्या बरोबर आहे असे देखील यावेळी आदित्य ठाकरे म्हणाले.
आदित्य ठाकरे यांची रॅली : प्रचार सभेच्या आधी शिवसेना नेते माजी मंत्री आदित्य ठाकरे यांच्या रॅलीने पुणे शहरातील वातावरण आज ढवळून निघाले. गर्दीचा उच्चांक, प्रचंड उत्साहात महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी जल्लोषात या रॅलीने कसब्यातील वातावरण ढवळून काढले. कसबा विधानसभा पोटनिवडणुकीतील महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांच्या प्रचारार्थ येथील लाल महालापासून रॅलीला सुरुवात झाली. ठिकठिकाणी या रॅलीचे जोरदार स्वागत होत होते. दुतर्फा नागरिकांनी प्रचंड मोठी गर्दी केली होती. फडके हौद- देवजीबाबा मठ- हमजेखान चौक- नाना चावडी चौक हिंदमाता चौक मार्गे साखळीपीर तालीम चौक येथे रॅलीचा समारोप झाला. सहा वाजता आदित्य ठाकरे यांचे आगमन झाल्यानंतर त्यांनी सर्वप्रथम लाल महालमधील बालशिवाजी, राजमाता जिजाऊ यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
शिवसेनेचे नेते सचिन आहेर, माजी आमदार मोहन जोशी, आदींसह महाविकास आघाडीतील तीनही पक्षांचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. शिवसेनेचे शहरप्रमुख संजय मोरे, गजानन थरकुडे, राजेंद्र शिंदे, नागेश खडके, संजय वाल्हेकर, विकी धोत्रे, मकरंद पठेकर, कॉंग्रेस पक्षाचे सुरेश कांबळे, दादासाहेब बोत्रे, माजी नगरसेविका पल्लवी जावळे आदी प्रमुख पदाधिकाऱ्यांसोबत आदित्य ठाकरे यांनी उघड्या जीपमधून रॅलीला सुरुवात केली. ‘पन्नास खोके, एकदम ओके’ तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा उल्लेख असलेल्या ‘गद्दार शिंदे’ अशा घोषणा देत रॅलीने लाल महालपासून प्रारंभ केला.