पुणे - विश्रांतवाडी परिसरात कचऱ्याच्या डब्यात स्त्री जातीचे जीवंत अर्भक आढळल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. बुधवारी सकाळी कचरा गोळा करत असताना लक्ष्मी ढेंबरे या सफाई सेविकेला हे अर्भक सापडले. दरम्यान, एका दिवसाच्या या नवजात अर्भकाला सध्या ससून रुग्णालयात ठेवण्यात आले आहे.
ढेंबरे या विश्रांतवाडी परिसरातील कचरा गोळा करण्याचे काम करतात. बुधवारी सकाळी त्या 'स्नेहगंध अपार्टमेंट' या इमारतीतील कचरा गोळा करत होत्या. यावेळी त्यांना एका कचऱ्याच्या डब्यात हालचाल जाणवली. त्यांनी काढून पाहिले असता हे नवजात अर्भक एका स्कार्फमध्ये गुंडाळलेल्या अवस्थेत आढळून आले.
हेही वाचा - एक दिवसाच्या नकोशीला फेकले नदीत; अमरावतीच्या धारणीमधील घटना
ढेंबरे यांनी ही माहिती तत्काळ इतर सहकाऱ्यांना तसेच महापालिका आरोग्य निरीक्षकांना कळवली. त्यांनी आळंदी रोड पोलीस चौकीला ही माहिती दिल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. उपचाराकरता अर्भकाला पोलिसांनी ससून रुग्णालयात दाखल केले आहे. पुढील तपास पोलीस करत आहेत.