बारामती- तालुक्यातील मेडद येथील पाणंद रस्त्याच्या उद्घाटन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांच्या हस्ते हा उद्धाटन सोहळा पार पडला. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी चक्क जेसीबी मशीनचे स्टेरिंग हाती घेऊन पानंद रस्त्यावरील काटेरी झुडपे हटविली. उद्घाटनाच्या या वेगळ्या स्टाईलने उपस्थितांच्या भुवया उंचावल्या.
उपमुख्यमंत्र्यांचा दौरा
मेडद येथे महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या संयोजनातून तसेच 'शरद पवार ग्रामसमृद्धी योजनेच्या' माध्यमातून येथील आरटीओ कार्यालय ते कहा नदी बंधाऱ्या पर्यंतच्या पाणंद रस्त्याच्या दुरुस्तीस सुरुवात करण्यात आली. आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा दौरा होता. यावेळी जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख देखील उपस्थित होते. यावेळी मेडद येथे पाणंद रस्त्याचे उद्घाटन जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते झाले. तत्पूर्वी ग्रामस्थांच्यावतीने सजवलेल्या बैलगाडीतून जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांना कार्यक्रम स्थळापर्यंत आणण्यात आले. यावेळी बैलगाडीचे सारथ्य देखील जिल्हाधिकारी देशमुख यांनी केले.
मे अखेर कामे पूर्ण
उद्घाटनावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी स्वतः जेसीबी मशीन चालून पाणंद रस्त्याचे काम सुरू केले. पालकमंत्री पाणंद रस्ते योजनाअंतर्गत बारामतीमध्ये एकूण १३३ रस्ते लांबी १८९ किमी प्रस्तावित केले असून १३ कामे लांबी १४ किमी पूर्ण झाले आहे. ही सर्व कामे लोकसहभागातून होणार आहेत. मे महिना अखेर सर्व कामे पूर्ण होतील असे प्रशासनाच्यावतीने सांगण्यात आले आहे.