पुणे : पहिल्या पत्नीबरोबर सुखी संसाराचा गाडा सुरू असताना पहिल्या पाच वर्षात पहिल्या पत्नीचा संशयास्पद मृत्यू झाला. त्याने दुसरे लग्न करुन दुसऱ्या पत्नीचा छळ करत तिला माहेरी जायला भाग पाडले. त्यानंतर तिसऱ्या महिलेशी प्रेमाचे सुत जुळवत एकत्र राहू लागला. मात्र, हे करताना अखेर तो पोलिसांच्या जाळ्यात अडकला आहे. दुसऱ्या पत्नीने केलेल्या तक्रारीवरुन पतीवर पैशांसाठी छळाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तीन बायका अन् फजिती ऐका, अशी परिस्थिती शिरुर तालुक्यातील करंदी गावच्या प्रशांत नप्तेवर आली आहे.
प्रशांतच्या पहिल्या पत्नीच्या मृत्यूनंतर त्याने जानेवारी 2015 मध्ये दुसरे लग्न केले. पहिल्या पत्नीची दोन मुले, प्रशांत, सासू शारदा, सासरा कैलास हे एकत्र रहात होते. त्यांनी लग्नाच्या पहिल्याच वर्षात पीडितेचा छळ करायला सुरुवात केली व घरातील खाण्यापिण्याचे पदार्थही ते लपवून ठेवू लागले. पती प्रशांत व सासरे कैलास या दोघांनी तर दारू पिऊन माहेरुन पैसे आणावेत म्हणून पीडितेला शिवीगाळ-दमदाटी सुरू केली.
दरम्यान प्रशांतच्या पहिल्या पत्नीपासून झालेल्या दोन मुलांना घेवून दुसरी पत्नी व प्रशांत हे चौघे भोसरी (पुणे) येथे रहायला गेले. तर, तिथे नणंद व तिचा पती हे दोघे येऊ लागले. त्यांनीही पीडितेला शिवीगाळ, मारहाण करुन छळ करायला सुरुवात केली. याच दरम्यान लग्नात माहेरकडून आलेले सर्व दागिने प्रशांतने मोडून टाकून पीडितेचा छळ वाढवला. या सर्वांना कंटाळून पीडिता माहेरी निघून गेली. यानंतर, प्रशांतने अन्य एका महिलेला घरी आणले व पत्नीसारखे घरी ठेवून तिच्यासोबत संसार सुरू केला.
अखेर हे सर्व असह्य झाल्यानंतर प्रशांतच्या दुसऱ्या पत्नीने शिक्रापूर पोलिसात पती, सासु-सासरे, ननंद, नंदावा यांच्या विरोधात तक्रार दाखल केली आहे. प्रशांत नप्तेच्या विरोधात शिक्रापूर पोलिसांत गुन्हा दाखल झाल्यानंतर प्रशांतच्या पहिल्या पत्नीच्या संशयास्पद मृत्यूच्या तपासाची संपूर्ण माहिती शिक्रापूर पोलीस मागवित आहेत. तर, तीन बायकांचा संसार या नवऱ्याला पुढील काळात अजूनच महागात पडणार आहे. प्रशांत नप्ते याच्यासह त्याचे आई-वडील, बहीण व दाजी यांना लवकर अटक करणार असल्याचेही शिक्रापूर पोलिसांनी सांगितले आहे.