पुणे - दारूच्या नशेत असणाऱ्या पोटच्या मुलाची आई-वडिलांनी हत्या केल्याची घटना पिंपरी-चिंचवड शहरात घडली आहे. या प्रकरणी मृत मुलाचे आई-वडील आणि भाऊ यांना वाकड पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. विजय रामदास वखरे (वय २८) असे हत्या झालेल्या मुलाचे नाव आहे.
हत्येप्रकरणी गणेश रामदास वखरे (वय ३०), रामदास श्रीधर वखरे (वय ५०), चंचल रामदास वखरे (वय ४६) असे अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. या प्रकरणी पोलीस उपनिरीक्षक रविंद्र सुखदेव मुदळ यांनी फिर्याद दिली आहे. दोन दिवसापूर्वी मृत विजय रामदास वखरे याने दारू पिल्यानंतर घरातील व्यक्तींशी वाद केला होता. यादरम्यान त्याने घरातील व्यक्तींना चावा घेत चाकू ने मारहाण केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. दारू पिल्यानंतर तो असच वागायचा. त्यामुळे, घरातील सर्व जण त्याला कंटाळले होते. आरोपी आई-वडील आणि भाऊ यांनी कट रचून विजयचे दोन्ही हात आणि पाय दोरीच्या साहायाने बांधले व त्यानंतर त्याचा दोरीने गळा आवळून खून केला.
हत्येनंतर पुरावा नष्ट करण्याचा हेतूने आरोपींकडून गळफास घेतल्याचा बनाव रचण्यात आला. परंतु, पोलिसांसमोर जास्त वेळ हा बनाव टिकला नाही. पोलीस चौकशीत विजयचा खून झाल्याचे उघड झाले. आरोपींनी गुन्हा कबुल केला असून त्यांना वाकड पोलिसांनी अटक केली आहे. घटनेचा अधिक तपास पोलीस अधिकारी चव्हाण करत आहेत.
हेही वाचा- "कोरोना से डरना नही तो लढना है" म्हणत कामगारांच्या धैर्याला पोलीसांनी टाळ्या वाजवत दिली सलामी