पुणे - प्राण्यांचा उपयोग मनोरंजनासाठी करणे बेकायदेशीर आहे. तसेच, श्वानांचे शोषण करून त्यांच्या शर्यतींचे आयोजन करण्यात येत आहे. त्यामुळे अशा शर्यतींवर केंद्र आणि राज्य सरकारने बंदी घालावी, अशी मागणी डॉ. कल्याण गंगवाल यांनी केली आहे.
यासंदर्भात सर्व शिवमंगल प्रतिष्ठानच्या वतीने बुधवारी पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते.
कल्याण गंगवाल म्हणाले की, मनोरंजन आणि स्पर्धेसाठी प्राण्यांचा वापर करणे कायद्याने गुन्हा आहे. काही वर्षांपूर्वी बैलगाडा शर्यती भरवल्या जात होत्या. मात्र, न्यायालयाने बैलगाडा शर्यतींवर बंदी आता आणली आहे. त्यानंतर श्वानांच्या शर्यतींचे आयोजन करण्यात येत आहे.
पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयाने काही दिवसांपूर्वी प्राण्यांनाही माणसांप्रमाणे जगण्याचा अधिकार असल्याचा निर्वाळा दिला आहे. या सगळ्या पार्श्वभूमीचा विचार करून केंद्र आणि राज्य सरकारने कुत्र्यांच्या शर्यती वरील निर्बंध कडक करण्याची गरज आहे. मात्र, सरकारने या शर्यतींवर कार्यवाही केली नाही, तर आम्ही यासंदर्भात न्यायालयामध्ये याचिका दाखल करणार असल्याचेही गंगवाल यांनी सांगितले आहे.