पुणे - जिल्ह्यात कोरोनाच्या बाधित रुग्णांची संख्या वाढत असली तरी वैद्यकीय अधिकारी, परिचारिका, पॅरा मेडिकल स्टाफ यांच्या अथक प्रयत्नामुळे कोरोनाबाधित रुग्ण बरे होण्याचे प्रमाणही लक्षणीय ठरत आहे. मंगळवारीही पुण्यात दिलासा देणारी बातमी समोर आली आहे. कोरोनाबाधित महिलेचा रिपोर्ट निगेटिव्ह आला आहे.
पुण्यातल्या भारती हॉस्पिटलमध्ये गेल्या 10 दिवसांपासून कोरोनाबाधित महिलेवर उपचार चालू होते. तिची प्रकृती अतिशय गंभीर होती. ती व्हेंटिलेटरवर होती. डॉक्टरांच्या अथक प्रयत्नाने व चांगल्या पद्धतीने लक्ष दिल्याने तिच्या प्रकृतीत चांगली सुधारणा झाली असून व्हेंटिलेटरवरून काढून तिला आयसीयूमध्ये शिफ्ट करण्यात आले आहे.
कोरोनाचे रुग्ण योग्य उपचाराने बरे होत आहेत, ही आनंददायी आणि उत्साहवर्धक बाब आहे. पुण्याचे जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनीही हॉस्पिटलचे अधिष्ठाता डॉ. संजय ललवाणी आणि त्यांच्या चमूचे कोरोना बाधित रुग्णांच्या सेवेबद्दल अभिनंदन केले आहे. पुण्यातील या 41 वर्षीय अंगणवाडी सेविकेला कुठलीही परदेश प्रवासाची हिस्ट्री नसताना कोरोनाची बाधा झाल्याचे समोर आल्याने खळबळ उडाली होती. तसेच लोकल ट्रान्समिशनची भीती व्यक्त केली जात होती. मात्र आता या रुग्णाच्या १४ दिवसानंतर दोन्ही टेस्ट निगेटिव्ह आल्या आहेत.
यानंतर आता या रुग्णांवर उपचार सुरू ठेवून नंतर डिस्चार्जबाबत निर्णय घेतला जाईल, असे पुणे विभागीय आयुक्तांनी सांगितले आहे. दरम्यान पुणे जिल्ह्यात 31 मार्चपर्यत 45 रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आढळलेले आहेत. त्यापैकी 16 जणांना कोरोनामुक्त झाल्यानंतर डिस्चार्ज देण्यात आला आहे. सध्या 28 जण उपचार घेत आहेत तर एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे.