पुणे : माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांनी गृहमंत्री अनिल देशमुखांवर धक्कादायक आरोप केले आहेत. त्यामुळे गृहमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकात पाटील यांनी केली आहे. यामुळे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे आता संकटात सापडले आहेत. 'उद्योगपती मुकेश अंबानींच्या घराबाहेरील स्कॉर्पिओ प्रकरणी पोलिस अधिकारी सचिन वाझेंवर गंभीर आरोप होत असताना गृहमंत्री अनिल देशमुख सभागृहात त्यांना वाचवण्याचा प्रयत्न करत होते; त्यामुळे आता वाझे हे गृहमंत्र्यांसाठी कलेक्शन करत होते हे समोर आले आहे. या संपूर्ण प्रकरणात गृहमंत्री आरोपी आहेत हे सिद्ध झाले आहे. त्यामुळे देशमुखांचा केवळ राजीनामा नाही तर त्यांची चौकशीही सुरू केली पाहिजे', असा आक्रमक पवित्रा चंद्रकांत पाटलांनी घेतला आहे.
हेही वाचा - परमबीर सिंग यांचा कथित लेटरबॉम्ब; 'हे' आहेत महत्त्वाचे दावे
ठाकरे सरकारचाच राजीनामा झाला पाहिजे -
चंद्रकांत पाटील म्हणाले, 'जर परमबीर सिंग खोटे बोलत असतील तर त्याचीदेखील शहानिशा केली पाहिजे. परमबीर सिंग यांच्या म्हणण्यानुसार राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि उद्धव ठाकरे यांनाही या गोष्टीची जाणीव होती. त्यामुळे माहिती असूनही त्यांनी या प्रकरणात काय कारवाई केली? त्यामुळे अशा प्रकारच्या भ्रष्ट गोष्टींची पाठराखण करणाऱ्या ठाकरे सरकारचाच राजीनामा झाला पाहिजे'.
हेही वाचा - परमबीर सिंग यांचे पत्र लक्ष विचलित करणारे; मात्र गृहमंत्री बदलणार नाही - जयंत पाटील
राजीनामा नाही तोपर्यंत भाजप शांत बसणार नाही-
आम्ही राज्यपालांना विनंती करतो की, महाराष्ट्रातील स्थिती हाताबाहेर गेली आहे. संपूर्ण महाराष्ट्र यांनी विकायला काढला आहे. कशाप्रकारे वसुली करावी यासाठी राज्याचे गृहमंत्री मार्गदर्शन करत आहेत. या संपूर्ण गोष्टीचा अहवाल राज्यपालांपर्यंत गेलाच पाहिजे. जोपर्यंत गृहमंत्री अनिल देशमुख राजीनामा देत नाहीत, तोपर्यंत भाजप स्वस्त बसणार नाही, असा इशारा देखील चंद्रकांत पाटलांनी दिला आहे. तसेच, दोन दिवसांपूर्वी मी माहितीच्या आधारेच सांगितलं होतं की, आणखी दोन मंत्र्यांचे राजीनामे होतील. त्याप्रमाणे आज अनिल देशमुख यांचा राजीनामा झालाच पाहिजे, असेही पाटील म्हणाले.
हेही वाचा - महाराष्ट्राचे राजकारण तापले; राज ठाकरे, रामदास आठवलेंनी केली गृहमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी
राष्ट्रवादी शिवसेनेला संपवत आहे-
जर उद्धव ठाकरेंना नीतिमत्तेची चाड असेल तर ते अनिल देशमुख यांचा राजीनामा घेतील. उद्धव ठाकरेंना माझे आवाहन आहे की, शरद पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा शिवसेना संपवायला निघाला आहे. महाराष्ट्राचे वनमंत्री असलेल्या शिवसेनेच्या संजय राठोड यांचा राजीनामा होतो आणि पण राष्ट्रवादीच्या धनंजय मुंडे यांचा राजीनामा होत नाही. वाझेंना निलंबित केलं जातं आणि अनिल देशमुखांना वाचवलं जातं. प्रत्येक वेळी राष्ट्रवादी काँग्रेस तुमच्यावर दबाव निर्माण करून सरकारची प्रतिमा बिघडवत आहे. त्यामुळे ठाकरेंनी देशमुख आणि गृहखात्यात हस्तक्षेप करणाऱ्या शिवसेना नेत्याचाही राजीनामा घ्यावा, असेही चंद्रकांत पाटील म्हणाले.