पुणे - 'पुढच्या लोकसभा निवडणुकीत रावसाहेब दानवे यांना घरी नाही बसवले, तर मी माझ्या बापाची अवलाद नाही', असा इशारा कन्नडचे माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांनी दिला आहे. तसेच 'माझ्यावर जे गुन्हे दाखल करण्यात आले आहे, ते सर्व रावसाहेब दानवे यांच्या राजकीय दबावाने दाखल करण्यात आले असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.
राजकीय दबावाने गुन्हा दाखल -
माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांच्यावर हत्येचा प्रयत्न केल्याच्या गुन्हा दाखल करण्यात आला होता. तीन महिन्यांनंतर त्यांना जामीन मिळाला आहे. माझ्यावर दाखल करण्यात आलेले गुन्हे हे सर्व खोटे असून रावसाहेब दानवे यांच्या राजकीय दबावामुळे ते दाखल करण्यात आले असल्याचे हर्षवर्धन जाधव यांनी म्हटले आहे. तसेच राज्य सरकारने मला संरक्षण द्यावे, अशी मागणी मी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली असल्याचेही ते म्हणाले.
काय आहे प्रकरण -
तक्रारदार अमन चड्डा सकाळच्या सुमारास आई-वडिलांना दुचाकीवरुन ब्रेमन चौकाकडे घेऊन जात होते. याच वेळी हर्षवर्धन जाधव आणि इशा झा हे रस्त्याच्या बाजूला एका चारचाकीमध्ये बसले होते. कारचा दरवाजा उघडल्याने चड्डा यांच्या दुचाकीचा अपघात झाला. यानंतर चड्डा यांनी चारचाकीमध्ये बसलेल्या हर्षवर्धन जाधव आणि ईशा यांना जाब विचारला. त्यावर हर्षवर्धन जाधव आणि ईशा यांनी अमन चड्डा आणि त्यांच्या वडिलांना मारहाण करण्यास सुरुवात केली. त्यावेळी त्यांनी वडिलांच्या हृदयाचे ऑपरेशन झाल्याचे सांगितले. मात्र, तरीही दोघांनी मारहाण करणे चालू ठेवले. यानंतर चड्डा यांनी जीवे मारण्याचा प्रयत्न झाल्याची तक्रार दिली होती. त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर चड्डा यांच्या तक्रारीवरून हर्षवर्धन जाधव यांना अटक करण्यात आली होती.
हेही वाचा - नागपूर; दादागिरी करणाऱ्या गुंडाची जमावाने केली दगडाने ठेचून हत्या