पुणे - चारित्र्यावर संशय घेऊन पतीने पत्नीची हत्या केल्याची घटना समोर आली आहे. आरोपी पतीने चारित्र्याच्या संशयातून पत्नीला मारहाण केली होती, तीचे डोके भिंतीवर आपटले होते. या मारहाणीत पत्नी गंभीर जखमी झाली होती. जखमी पत्नीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. याप्रकरणी हडपसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
संगीत राजेश सोनी (वय 22) असे खून झालेल्या विवाहितेचे नाव आहे. याप्रकरणी राजेश महावीर सोनी (वय 25) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत मयत महिलेचा भाऊ नबीन जलाना (वय 25, रा. पिंपरी) यांनी तक्रार दिली आहे. याप्रकरणी अधिक माहिती अशी की, सोनी दाम्पत्य फुरसुंगी परिसरात राहत होते. काही वर्षांपूर्वी त्यांचा विवाह झाला होता. मयत संगीता या गृहिणी होत्या. आरोपी राजेश हा पत्नीवर सतत संशय घेत होता. यावरून त्यांच्यात वाद होत असत. दरम्यान 17 जानेवारी रोजी त्यांच्यात वाद झाले. त्यावेळी त्याने तू कोणत्या मुलाला बोलतेस असे म्हणून मारहाण करण्यास सुरुवात केली. मारहाणीत संगीता यांचे डोके भिंतीवर आपटल्याने त्या गंभीर जखमी झाल्या होत्या.
गुन्हा दाखल होताच आरोपी फरार
त्यानंतर त्याने जखमी पत्नीला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले, रुग्णालयात आपघाताचे खोटे कारण सांगितले. संगिता यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू होते, मात्र उपचारादरम्यान त्यांचा सोमवारी मृत्यू झाला. यानंतर मृत संगिता यांच्या भावाने पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. पोलिसांनी याप्रकरणी पती राजेश सोनी याच्याकडे चौकशी केली असता संगीता यांचा मारहाणीत मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे, परंतु गुन्हा दाखल होताच आरोपी फरार झाला असून, आरोपीचा शोध सुरू असल्याची माहिती हडपसर पोलिसांनी दिली.