पुणे - अमेझॉन प्राईमवर पाकिस्तानी ड्रामा पाहणाऱ्या पत्नीच्या डोक्यात कोयत्याने सपासप वार करुन पतीने तिला ठार मारण्याचा प्रयत्न केला. ही धक्कादायक घटना सॅलिस्बरी पार्क परिसरात घडली. या हल्ल्यात पत्नी गंभीर जखमी झाली असून तिच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. नर्गिस असिफ नायब, असे जखमी पत्नीचे नाव आहे. तर आसिफ नायब, असे पतीचे नाव असून स्वारगेट पोलिसांनी त्याला अटक केली आहे.
असीम नायब यांचा होर्डिंग लावण्याचा व्यवसाय आहे, तर नर्गीस या गृहिणी आहेत. त्यांना एक मुलगा आणि एक मुलगी आहे. पुण्यातील पार्क परिसरात ते वास्तव्यास आहेत. ही घटना घडण्याच्या एक दिवस अगोदर नर्गीस यांनी मुलाला दूध आणण्यासाठी पाठवले होते. त्यावेळी येताना मुलाच्या हातून दुधाची पिशवी पडली आणि फुटली होती. त्यामुळे नवरा-बायकोमध्ये जोरात भांडण झाले होते. तेव्हापासून ते एकमेकांशी बोलत नव्हते.
घटनेच्या दिवशी पती असिफ हे टीव्ही पाहत होते, तर पत्नी नर्गीस बेडरुममध्ये जाऊन मोबाईलवर पाकिस्तानी ड्रामा पाहत होती. तेवढ्यात आसिफ तेथे हातात कोयता घेऊन आला. तुला पाकिस्तानी ड्रामा पाहू नको, असे सांगितले, तरी तू का पाहतेस ? कालही माझ्याशी भांडलीस, असे म्हणत तिच्या डोक्यावर कोयत्याने सपासप वार केले. हे वार अडविण्यासाठी नर्गिस यांनी हात वर केला असता, त्यांच्या हाताचा अंगठा तुटून खाली पडला. त्यानंतर नर्गीस यांनी आरडाओरडा केला. त्यामुळे शेजारच्या लोकांनी मध्यस्थी केली आणि जखमी नर्गीस यांना रुग्णालयात दाखल केले.
स्वारगेट पोलिसांना याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी काही तासातच आरोपी असिफ नायब याला अटक केली. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक उसगावकर करीत असल्याची माहिती स्वारगेट पोलीस ठाण्याचे निरीक्षक अशोक कदम यांनी दिली.