शिरुर (पुणे) - पुणे नगर महामार्गालगत गॅस पाईपलाईनचे खोदकाम चालू असताना मानवी हाडांचा सांगाडा, कवटी आणि मानवी हाडे सापडल्याची धक्कादायक घटना घडली आहे. आज सकाळच्या सुमारास सणसवाडी येथे हे खोदकाम सुरू असताना ही बाब समोर आली. शिक्रापूर पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून घातपातातून येथे ही हाडे पुरण्याची घटना घडली आहे का, याबाबत तपास करत आहेत.
हेही वाचा - सहा तास दोरखंडाने बांधून मारहाण; सात जणांविरुद्ध गुन्हा
मानवी हाडांचे नमुने तपासणीसाठी पाठवले
सणसवाडी, रांजणगाव, शिक्रापूर या औद्योगिक वसाहत क्षेत्रात असंख्य कामगार कामानिमित्त वास्तव्य करत आहेत. त्यातच आज सकाळच्या सुमारास अगदी नगर-पुणे महामार्गालगत मानवी हाडांचा सापळा आढळून आल्याने सर्वत्र खळबळ उडाली आहे. हा मानवी सापळा कुणाचा आहे, याबाबत अद्याप माहिती मिळू शकलेली नाही. या ठिकाणी आढळून आलेला मानवी सांगाडा, कवटी आणि मानवी हाडे यांचे नमुने वैद्यकीय अधिकाऱ्यांकडे तपासणीसाठी पाठवले असून यासंदर्भातील अहवाल प्राप्त झाल्यानंतर शिक्रापूर पोलीस या घटनेचा सखोल तपास करणार आहेत.
पुणे नगर महामार्गावर गॅस पाईपलाईनचे काम जोरात सुरू आहे. या कामासाठी खोदकाम करत असताना सणसवाडी येथे मानवी हाडांचा सापळा आढळून आला. हा सापळा पुरुषाचा आहे की, महिलेचा आहे, याबाबत अद्याप संभ्रम आहे. याबाबतीत अधिक माहिती मिळवण्यासाठी शिक्रापूर पोलीस परिसरात हरवल्याची नोंद झालेल्या व्यक्तींचा तपास करत आहेत.
हेही वाचा - "मियावाकी"प्रकारची शहरी वने राज्यातील प्रत्येक शहरांत व्हावीत- आदित्य ठाकरे