शिरुर (पुणे) - कोरोना महामारीचे संकट देशावर असताना आपलं कर्तव्य व जबाबदारी निभावताना एकाच कुटुंबतील सदस्य काही ठिकाणी दिसत आहेत. पुण्यात आई गावचा कारभार तर तीन मुली पोलीस दलात दिवसरात्र कर्तव्य बजावत काम करत आहेत. या मायलेकी आहेत शिरूर तालुक्यातील इनामगावच्या म्हस्के कुटुंबातील. त्यांच्या कार्याची दखल खुद्द गृहमंत्र्यांनी घेऊन कतर्व्याला सलाम केलाय.
मुलींना कशाला हवं शिक्षण? त्यांनी लग्न होऊन सासरी जावं. 'रांधा, वाढा, उष्टी काढा' हे निमूटपणे करावं. 'चूल आणि मूल' यातच रमावं, अशी खेडोपाड्यात सर्वसाधारण पद्धत. पण, शिरूर तालुक्यातील इनामगावच्या म्हस्के कुटुंबानं मुलींच्या बाबतीत एक वेगळाच आदर्श समाजापुढं घालून दिलाय. या तीनही मुलींना पोलीस दलात आपलं कर्तव्य बजावत आहे
घरची गरिबी असूनही.....
शिरुर तालुक्यातील इनामगाव हे खेडेगाव गाव आहे. वडील भरत म्हस्के यांचे शिक्षण सातवीपर्यंत, तर आई मंगल म्हस्के चौथी शिकलेल्या आहे. या उभयतांना प्रतिभा, शुभांगी, स्मिता या तीन मुली झाल्या. तिघींच्या पाठीवर सिद्धेश्वर हा मुलगा त्यानंतर मनिषा,कीर्ती, गिरिजा या मुली झाल्या असा नऊ जणांचा हा परिवार आहे म्हस्के कुटुंबाचा शेतीवरच उदरनिर्वाह आहे परिस्थिती अत्यंत हलाखीची असतानाही सर्व मुलांना त्यांनी चांगले शिक्षण दिले.
पहिल्याच प्रयत्नात घवघवीत यश
पोलिस दलात कर्तव्य बजावत असलेल्या शुभांगी, गिरिजा, कीर्ती या तीनही बहिणींनी प्राथमिक शिक्षण गावातील मराठी माध्यमातील शाळेत घेतले. शुभांगी यांनी बारामती येथे टी. सी. कॉलेजला, गिरीजा यांनी पुण्यातील वाडिया महाविद्यालयात, तर कीर्ती यांनी फर्ग्युसन महावि्दयालयात पदवीपर्यंतचे शिक्षण घेतले. शुभांगी व कीर्ती आणि गिरिजा यांना पोलीस अधिकारी व्हावे असे नेहमी वाटत असताना तिघींनीही थेट पोलीस उपनिरीक्षक पदावर झेप घेतली. या तीनही बहिणींची पोलिस दलात एकाच पदावर निवड झाल्याने त्यांच्या कुटुंबाला मोठा आनंद झाला.
आई, वडील आणि भावाचे पाठबळ
पोलिस खात्यात पोलीस उपनिरीक्षक पदावर काम करत असलेल्या कीर्ती यांनी सांगितले, की ''अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत आम्ही तिघी बहिणींनी शिक्षण घेतले. यासाठी सातत्याने आई मंगल आणि वडील भरत म्हस्के, तसेच भाऊ सिद्धेश्वर यांचे मोठे पाठबळ मिळाले. त्यामुळेच मोठ्या पदावर काम करण्याची संधी मिळाली. आम्ही तीन ही बहिणी पोलीस खात्यात चांगल्या पदावर काम करत असल्याचा अभिमान आम्हाला वाटतो.''
शुभांगी पवार म्हस्के या गुन्हे अन्वेषन विभाग, पुणे येथे पोलिस निरीक्षक म्हणून सध्या कार्यरत असून कीर्ती या कोंढवा वाहतूक विभागात पोलीस उपनिरीक्षक पदावर कार्यरत आहेत. गिरीजा याही अतिक्रमण विभागात पोलीस उपनिरीक्षक पदावर काम करत आहेत. कोरोनाच्या या लढाईत एकाच कुटुंबातील तीनही बहिणी महाराष्ट्र पोलीस दलात अहोरात्र कर्तव्य बजावत आहेत. या कर्तृत्वान मुलींची आई मंगल म्हस्के यादेखिल इनामगाव येथे सरपंच पदाच्या माध्यमातून समाजाच्या सेवेसाठी झटत आहेत.
गरीब शेतकरी कुटुंबातून कुठलीही पार्श्वभूमी नसतानाही केवळ जिद्द, चिकाटी, मेहनत घेत स्वकर्तृत्त्वावर यशाचे शिखर गाठता येते हे तीन बहिणींनी दाखवून दिले आहे. स्पर्धा परीक्षा देणाऱ्या प्रत्येक युवक युवतीसाठी ही यशाची कथा निश्चित प्रेरणादायी ठरणार आहे.