पुणे : कसबा पोटनिवडणुकीसाठी आज उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस आहे. सर्वच पक्षाकडून अपक्ष तसेच बंड उमेदवारांची मनधरणी करण्याचे काम सुरू आहे. हिंदू महासंघाचे उमेदवार आनंद दवे यांना देखील काल भाजपचे वरिष्ठ नेते मंडळी भेटल्याची चर्चा सुरू आहे. यावर दवे म्हणाले की, मला भारतीय जनता पक्षाचे वरिष्ठ नेते भेटले. आमची नियमितपणे चर्चा झाली, मी ही निवडणूक लढवणार आहे. असे यावेळी दवे यांनी यावेळी सांगितले.
हिंदू महासंघ घेणार नाही : भाजपच्या नेत्यांकडून उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी सांगितले जात आहे. मात्र हिंदू महासंघ आता माघार घेण्याच्या पर्यायापासून खूप पुढे आला आहे. त्यामुळे अशा प्रकारची माघार हिंदू महासंघ घेणार नाही. ही निवडणूक लढवून जिंकून येणार असल्याचा विश्वास यावेळी दवे यांनी व्यक्त केला. सध्या व्यक्तिगत गाठीभेटींना सुरुवात केली आहे. तसेच कसब्यामध्ये राहणाऱ्या माझ्या मित्र परिवारासोबत संपर्क साधत आहे. मी फक्त हिंदू मतदारांना भेटत आहे. पुण्येश्वर धाम मुक्त व्हावा, असे ज्या मुस्लिम लोकांना वाटत असेल त्यांनी देखील मला मतदान केले तरी चालेल. मात्र मी त्यांना भेट द्यायला जाणार नाही. पुण्येश्वर मुक्त करणे, आर्थिक आरक्षण, वाडे व जुन्या इमारतींची सुरक्षा, स्वच्छ व सुरक्षित कसबा, वाहतूक कोंडी अशा विविध कामांसाठी कसबा मतदारसंघातून निवडून येणार असल्याची माहिती देखील त्यांनी यावेळी दिली.
शिवसेनेचे टेन्शन वाढवले : भाजप आमदार मुक्ता टिळक यांच्या निधनानंतर कसबा पेठ विधानसभा मतदारसंघात पोटनिवडणूक जाहीर झाली आहे. 26 फेब्रुवारीला या पोटनिवडणुकीसाठी मतदान होणार आहे. या पोटनिवडणुकीत भाजप विरुद्ध महाविकास आघाडी असा सरळ सामना होत आहे. शिवसेनेचा मित्र पक्ष असलेल्या संभाजी ब्रिगेडमुळे शिवसेनेची मात्र महाविकास आघाडीत गोची होताना दिसत आहे. कसबा पेठ पोटनिवडणुकीत शिवसेनेचा मित्र पक्ष असलेल्या संभाजी ब्रिगेड यांच्याकडून अविनाश मोहिते यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. काल संभाजी ब्रिगेडच्या वतीने पुण्यातील लाल महल येथे राजमाता जिजाऊंना अभिवादन करून प्रचाराचा नारळ देखील फोडण्यात आला आहे. अशात महाविकास आघाडी म्हणून शिवसेना ही निवडणूक लढवत असताना मित्रपक्षाने मात्र शिवसेनेचे टेन्शन वाढवले आहे.
अर्ज मागे घेण्याची विनंती करणार : आज तीन वाजेपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत आहे. त्यामुळे संभाजी ब्रिगेडच्या अविनाश मोहिते यांना आपला उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी शिवसेनेकडून विनंती करण्यात येणार असल्याची माहिती आहे. शिवसेनेचे संपर्कप्रमुख सचिन अहिर हे आज पुणे दौऱ्यावर आहेत. यावेळी ते अविनाश मोहिते यांची भेट घेऊन त्यांना आपला उमेदवारी अर्ज मागे घेण्याची विनंती करणार आहेत. दरम्यान संभाजी ब्रिगेड कसबा पोटनिवडणूक लढवणार आहे. म्हणून तर अधिकृत उमेदवार म्हणून अविनाश मोहिते यांनी उमेदवारी अर्ज भरला आहे.
मागे हटणार नाही : काँग्रेस, राष्ट्रवादीसह इतर पक्ष दबाव टाकत आहेत. मात्र संभाजी ब्रिगेड कोणाच्याही दबावाला बळी पडणार नाही. संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष व महासचिव या वरिष्ठ नेत्यांच्या आदेशानुसारच कसबा व चिंचवड मतदार संघात संभाजी ब्रिगेडचा अधिकृत उमेदवारी अर्ज भरलेला आहे. 'आम्ही मागे हटणार नाही.' वरिष्ठ जो निर्णय घेतील तो आम्हाला मान्य राहील. असे संभाजी ब्रिगेडचे प्रदेश सरचिटणीस संतोष शिंदे यांनी संगितले आहे.