दौंड(पुणे)- तालुक्यातील कुरकुंभ औद्योगिक वसाहतीतील अल्कली अमाईन्स केमिकल कंपनीच्या बॉयलर जवळील कंपनीच्या भिंतीनजिक हायड्रा क्रेनच्या चाकाखाली सापडून क्रेनच्या हेल्परचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे . या घटनेत हेल्परच्या मृत्यूस कारणीभूत झाल्याप्रकरणी क्रेन चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
क्रेनच्या चाकाखाली सापडून हेल्पर जागीच ठार-
कुरकुंभ औद्योगिक वसाहतीतील पांढरेवाडी गावच्या हद्दीतील अल्कली अमाईन्स केमिकल कंपनीत क्रेनच्या साह्याने काम करण्यात येत असताना क्रेन चालकाचा क्रेन वरील ताबा सुटला. चालकास क्रेन कंट्रोल न झाल्याने अल्कली कंपनीचे बॉयलर एरियाच्या वॉल कंपाऊंडला धडकले. सदर हायड्रा क्रेनवर बसलेला हेल्पर सुजित्तकुमार बारेलाल सिंह (वय 21 वर्ष, राहणार सध्या- कुरकुंभम, जिल्हा-पुणे; मूळ राहणार वॉर्ड नंबर 6 मेहसी जोगा टोला, ता- विभूतीपुर जिल्हा- समस्तीपुर राज्य- बिहार) हा खाली पडला व तो हायड्रा क्रेनच्या पाठीमागील डाव्या बाजूच्या चाकाखाली सापडून त्याचा जागीच मृत्यू झाला.
क्रेन चालकावर गुन्हा दाखल -
क्रेन चालक सुनील रामजुझवल यादव ( सध्या राहणार- कुरकुंभ जिल्हा- पुणे ) (मूळ राहणार- दिकतोली पोस्ट- तामाखारा जिल्हा -संतकबीर नगर, उत्तर प्रदेश ) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लतीफ याकुब सय्यद यांनी सदर प्रकरणी कुरकुंभ पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिली आहे. अधिक तपास पोलीस निरीक्षक नारायण पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक लोंढे हे करीत आहेत.