पुणे - गुजरात सरकारने महानगरपालिका क्षेत्रात हेल्मेटचा वापर ऐच्छिक केला आहे. असाच निर्णय महाराष्ट्रात देखील घ्यावा, अशी मागणी पुण्यातून होते आहे. पुण्यातील हेल्मेट सक्तीला विरोध करणाऱ्या पुणेकर हेल्मेटसक्ती विरोधी कृती समितीने ही मागणी केली आहे. शहरातील एकंदर परिस्थिती पाहता येथे ही हेल्मेटसक्ती होऊ नये, अशाप्रकारची मागणी पुन्हा एकदा या समितीने केली आहे.
हेही वाचा - #hyderabadEncounter: राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाने दिले चौकशीचे आदेश
द्रुतगती महामार्ग आणि इतर महामार्गांवर हेल्मेटसक्तीबाबत कृती समितीचा पाठिंबा आहे. मात्र, महापालिका आणि पालिका परिसरात ही सक्ती नसावी, अशी समितीची मागणी होती. साधारणत: दोन वर्षांपासून हेल्मेटचा वापर न केल्यामुळे पोलिसांकडून दंड वसुली करत असताना काही ठिकाणी जो अतिरेक केला गेला त्याला कृती समितीचा विरोध आहे.
हेही वाचा - पुण्यात भारत-श्रीलंका दहशतवाद विरोधात संयुक्त लष्करी सराव लष्कराचा
गुजरात सरकारच्या निर्णयामुळे अशाप्रकारे दुचाकी वाहनचालकांना दिलासा देणे राज्य सरकारच्या अख्त्यारित असल्याचे स्पष्ट झाले आहे. म्हणूनच याबाबत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना समितीच्यावतीने निवेदन देण्यात येणार असून, गुजरात सरकारप्रमाणेच महाराष्ट्र सरकारनेही असा निर्णय घ्यावा आणि नागरिकांना दिलासा देवून महानगरपालिका, नगरपालिका क्षेत्रातील हेल्मेटसक्ती रद्द करावी, अशी मागणी करण्यात येणार आहे.