पुणे - उरळी कांचनमध्ये रविवारी सायंकाळी ढगफुटी झाल्याने मोठे नुकसान झाले आहे. बाजारपेठेत आणि घरात पाणी शिरल्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले होते. उरळी कांचनपासून पाच ते सहा किलोमीटर अंतरावर असलेल्या वळती घाटात रविवारी ढगफुटी झाल्याने वळती आणि शिंदवणे गावात असलेल्या तलावांची पाणीपातळी मोठ्या प्रमाणात वाढली.
सुरक्षेचा उपाय म्हणून प्रशासनाकडून हे दोन्ही बंधारे फोडून पाण्याला वाट करून देण्यात आली. त्यामुळे या गावांमधून उरळी कांचनला जाणारा रस्ता पुराच्या पाण्यामुळे बंद झाला होता. या पाण्याचा उरळी कांचंन परिसरातील घरांना मोठा फटका बसला. पाणी घरात शिरल्याने नागरिकांचे मोठे नुकसान झाले आहे. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस आणि प्रशासनाचे अधिकारी गावात दाखल झाले होते.