पुणे - खेड, आंबेगाव, जुन्नर, शिरूर तालुक्यात ऐन हिवाळ्यात आज (मंगळवारी) पावसाची जोरदार बँटिंग झाली. सकाळी थंडी, दिवसभर ऊन आणि त्यात आता सुरु झालेला पाऊस, असे समीकरण सध्या सुरू झाले आहे. यामुळे हिवाळा, उन्हाळा, पावसाळा असे तिन्ही ऋतू एकत्र आल्याचे चित्र निर्माण झाले आहे.
वातावरणातील बदलामुळे आज (मंगळवारी) दुपारपासून पावसाच्या सरी अचानक सुरू झाल्या. यामुळे नागरिकांची आणि शेतकऱ्यांची धावपळ सुरू झाली. तर या पावसामुळे शेतीचे मोठे नुकसान होणार, असे चित्र आहे. तसेच थंडी, ऊन आणि पाऊस असे समीकरण तयार झाल्याने वातावरणात रोगराई पसरण्याची भीती निर्माण होत आहे.
हेही वाचा - 24 आणि 25 डिसेंबरला राज्यातील काही भागात पावसाची शक्यता; हवामान खात्याचा अंंदाज
सध्या सुरू झालेल्या पावसामुळे रब्बी हंगामातील पिकांना मोठा धोका निर्माण होऊ शकतो. वातावरणात होत असलेल्या बदलामुळे पिकांवरील रोगराई वाढण्याची चिन्ह निर्माण झाली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी कृषी सल्ला घेऊन पिकांवर वेळीच फवारणी करण्याची आवश्यकता आहे.