पुणे/ लोणावळा - लोणावळ्यात गेल्या 24 तासात तब्बल 400 मिमी पाऊस कोसळला आहे. येथे अक्षरशः लोणावळाकरांना पावसाने (lonavala rain) झोडपून काढले आहे. येथे अनेक सखल भागात पाणी साचले. शिवाय अनेकांच्या घरातही पाणी शिरले. तर ढगफुटी सदृश्य परिस्थिती झाल्याची माहिती टाटा धरण प्रमुख यांच्याकडून देण्यात आली आहे. अवघ्या 3-4 तासात तब्बल 150 ते 175 मिमी पाऊस झाल्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. अनेकांच्या बंगल्यात पाणी शिरले असून त्यांना नगर पालिकेच्या पथकाने सुखरूपस्थळी हलवले, अशी माहिती मुख्याधिकारी सोमनाथ जाधव यांनी दिली आहे.
लोणावळ्यात वर्षातील विक्रमी पावसाची नोंद
लोणावळा परिसरात यावर्षीच्या विक्रमी पावसाची नोंद झाली आहे. 24 तासात तब्बल 400 मिमी पाऊस झाला आहे. गेल्या काही दिवसांपासून पावसाने पुनरागमन केले आहे. बुधवारी (21 जुलै) दिवसरात्र मुसळधार पाऊस पडला आहे. यामुळे अनेक सखल भागात पाणी साचले. त्याचबरोबर अनेकांच्या घरातही पाणी शिरले. त्यांच्या मदतीसाठी लोणावळा शिवदुर्ग रेस्क्यू पथक आणि नगरपालिका धावून गेले.
लोणावळ्यात ढगफुटी सदृश्य परिस्थिती
लोणावळ्यात ढगफूटी सदृश्य परिस्थिती आहे. गेल्या 3-4 तासांत 150-175 मिमी पावसाची नोंद झाल्याचे समोर आले आहे. लोणावळा धरणाच्या द्वारविरहीत सांडव्यावरून पुढील 3-4 तासात विसर्ग सुरू होण्याची शक्यता आहे. कृपया हुडको काॅलनी आणि इतर सखल भागात High Alert संदेश देण्यात यावा, असे टाटा पावर धरण प्रमुख बसवराज मुन्नोळी यांच्याकडून सूचित करण्यात आले आहे.
पवना धरणाच्या पाण्यात 10 टक्क्याने वाढ
तर, मावळ तालुक्यातील पवना धरण परिसरात देखील मुसळधार पाऊस झाला. पवना धरणाची पाणी पातळी 10 टक्क्याने वाढली आहे. तर, इंद्रायणी नदीवरील कामशेत नाणोली पूल पाण्याखाली गेला आहे.
चिपळून शहर पाण्यात
चिपळून शहर सध्या पाण्यात आहे. शहरातील जुना बाजार पूल, बाजारपेठ, जुने बस स्थानक, चिंचनाका मार्कंडी, बेंदर्कर आळी, मुरादपूर रोड, भोगाळे, परशूराम नगर परिसरात पाणी वाढत आहे. काही ठिकाणी पाच फुटांपेक्षा जास्त पाणी आहे. जिल्ह्यासाठी पुणेहून NDRF च्या दोन टीम रेस्क्यू ऑपरेशनसाठी दाखल झाल्या आहेत.
रत्नागिरीत पूर सदृश्य परिस्थिती
बुधवारी दुपारपासून रत्नागिरी शहर आणि जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात पाऊस सुरू आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी पूर सदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. शहरातील ब्रिटिशकालीन बहाद्दूर शेख पूल वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. अनेक घरांमध्ये छपरापर्यंत पाणी आल्याने शेकडो लोक पाण्यात अडकले आहेत. पुढील आणखी तीन दिवस मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाकडून देण्यात आला आहे. त्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने नदी काठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.
खेडमध्ये पुराचं पाणी, मुंबई-गोवा महामार्ग बंद
खेड शहरात जगबुडी नदीच्या पुराचं पाणी शिरलं आहे. रात्रीपासून पाणी बाजारपेठेत घुसलं. त्यामुळे जनजीवन विस्कळीत झालं आहे. अतिवृष्टीमुळे मुंबई-गोवा महामार्गावरील अंजणारी पुलावरील वाहतूक बंद आहे. पुढील आदेश येईपर्यंत वाहतूक थांबवण्यात येणार आहे.
पंचगंगा नदीची धोक्याच्या पातळीकडे वाटचाल
पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत सातत्याने वाढ होत चालली आहे. पावसाचा जोर असाच कायम राहिल्यास पंचगंगा नदी धोक्याची पातळी ओलांडण्याची शक्यता आहे. सध्याची पाणी पातळी 39 फूट इतकी आहे. धोका पातळी 43 फूट इतकी आहे. त्यामुळे जिल्ह्यातील नदीकाठच्या गावांना प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला आहे. काही गावातील लोकांना स्थलांतर करण्याच्या सूचनासुद्धा प्रशासनाने दिल्या आहेत.
वाचा, अरुणावती नदीच्या पुलावर मधोमध अडकला शेतकरी- व्हिडिओ
हेही वाचा - MAHA Rain Update: राज्यात अनेक नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली, चिपळूण शहराला पुराचा वेढा