पुणे - शहरातील रेल्वे स्थानकाच्या पार्किंगमागील रस्त्यावर हॅण्डग्रेनेड सदृश्य वस्तू आढळल्याने परिसरात खळबळ उडाली. पुणे पोलिसांच्या बॉम्बशोधक व नाशक(बीडीडीएस) पथकाला चार तासांच्या प्रयत्नानंतर संबंधित वस्तू निकामी करण्यात यश आले. त्यानंतर त्याचे काही अंश पुढील तपासणीसाठी फॉरेन्सिक लॅबमध्ये पाठवण्यात आले आहेत.
ताडीवाला रस्त्यावरून रेल्वे स्थानकाच्या फलाटावर जाण्यासाठी पादचारी उड्डाणपूल असून, याच ठिकाणी रेल्वेचे मुख्य कार्यालय आहे. या पुलशेजारी असलेल्या पार्किंगच्या मागील रस्त्यावर साफसफाई करणा-या कर्मचा-याला हॅण्डग्रेनेड सदृश्य वस्तू आढळली. या व्यक्तीने तातडीने संबंधित माहिती रेल्वे प्रशासनाला कळवली. यानंतर घटनास्थळी बंडगार्डन पोलीस व बीडीडीएसचे पथक दाखल झाले. पोलीस पथकाने परिसराची नाकाबंदी केली.
बॉम्ब नाशक पथकाने पाहणी केल्यानंतर या ठिकाणी विस्फोटक वस्तू असल्याची खात्री करुन ती मोकळ्या मैदानात नेऊन निकामी करण्यात आली.
संबंधित वस्तूचे नमुने गोळा करुन पुढील तपासणीकरण्यासाठी फॉरेन्सिक लॅबमध्ये पाठवण्यात आले आहेत.