पुणे - पिंपरी-चिंचवडमध्ये इयत्ता आठवीचे ऑनलाइन शिक्षण घेणाऱ्या अल्पवयीन मुलीला झूम अॅपवर अश्लील, जीवे मारण्याची धमकी आणि आत्महत्येस प्रवृत्त केले जात असल्याचा मॅसेज अज्ञात व्यक्ती पाठवत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या प्रकरणी पीडित मुलीच्या आईने भोसरी एमआयडीसी पोलिसात तक्रार नोंदवली असून विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मागील काही महिन्यांपासून येत आहेत अश्लील मेसेज
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पिंपरी-चिंचवड परिसरातील मोशी येथे ऑनलाइन शिक्षण घेणाऱ्या मुलीला गेल्या काही महिन्यांपासून अश्लील मेसेज पाठवले जात असल्याचे समोर आले आहे. प्रकरण जास्तच वाढल्याने मुलीच्या पालकांनी पोलिसांकडे धाव घेतली आहे.
कोरोनामुळे ऑनलाइन शिक्षण आहे सुरू
कोरोना महामारीमुळे शालेय विद्यार्थी हे ऑनलाइन शिक्षण घेत आहेत. परंतु ज्या झूम अॅपवरून हे शिक्षण दिले जात आहे. त्यालाच हॅक करून आठवीतील अल्पवयीन मुलीला अश्लील मॅसेज पाठवले जात आहेत. दरम्यान मुलाला आत्महत्येस प्रवृत्त केले जात आहे. पीडित मुलीचे वडील आणि मुख्याध्यापक यांच्या मेलवर देखील मुलीबद्दल अश्लील मेसेज केले आहेत, असे पोलिसांनी सांगितले आहे.
पोलिसांचे आवाहन
हे सर्व गंभीर प्रकरण असून याचा पोलीस तपास करत आहेत. असे काही प्रकार घडत असल्यास मुलांच्या पालकांनी पुढे येऊन पोलिसात तक्रार द्यावी, असे पोलिसांकडून आवाहन करण्यात आले आहे.
हेही वाचा - आमदार राहुल कुल यांच्या अध्यक्षतेखाली दौंड तालुका क्रीडा संकुल समितीची आढावा बैठक
हेही वाचा - बारामतीत विदेशी बनावटीची दारू जप्त; कारमधून सुरू होती तस्करी