पुणे - बारामतीत दोन वेगवेगळ्या ठिकाणी छापे टाकून तब्बल 30 लाखांचा गुटखा जप्त करण्यात आला आहे. अप्पर पोलीस अधीक्षक जयंत मीना यांना शहरातील वसंत नगर व कसबा परिसरात मोठ्या प्रमाणात गुटखा साठवल्याची माहिती मिळाली. तसेच या ठिकाणाहून संबंधित गुटख्याची वाहतूक होत असल्याचे देखील कळले. यानुसार बारामती गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी छापे टाकून तब्बल 30 लाख रुपयांचा गुटखा जप्त केला.
वसंत नगरमधील गोडाऊनवर टाकलेल्या या छाप्यांमध्ये 11 लाख तर, अन्य ठिकाणाहून 18 लाख 99 हजार 700 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी संतोष लक्ष्मण गायकवाड आणि हरी दगडू नवले यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून एकाला अटक करण्यात आली आहे.
अवैध व्यवसायांवर कारवाईची मागणी
राज्यात सर्वत्र बंदी असतानाही छुप्या पद्धतीने मोठ्या प्रमाणात गुटख्याची तस्करी आणि विक्री होत असल्याचे समोर आले आहे. याला लगाम घालण्यासाठी पोलिसांनी पावले उचलली आहेत. यामुळे अवैध व्यावसायिकांचे धाबे दणाणलेत. याच प्रकारची कारवाई इतरत्र करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.