पुणे- परिसरात दहशत माजवत कोयता, दगड आणि लाकडी दांडक्याने वाहनांची तोडफोड केल्याची घटना पिंपरीमध्ये उघडकीस आली आहे. या घटनेत तीन वाहनांच्या काचा फोडण्यात आल्या असून चार जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यातील एकाला पिंपरी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
जावेद साबीर सय्यद, भावड्या धोतरे, वसीम साबीर सय्यद आणि इतर एक जण असे मिळून चार आरोपी आहेत. यात वसीम साबीर सय्यद याला पोलिसांनी अटक केली आहे. या प्रकरणी अभिजित मोरे यांनी पिंपरी पोलिसात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पिंपरीमधील खराळवाडी येथे रात्री ९ च्या सुमारास फिर्यादी यांचा भाऊ घराबाहेर थांबला होता. दरम्यान, आरोपी जावेद, भावड्या, वसीम आणि इतर एक जणाने आमच्याकडे रागाने का बघतो, असे म्हणून त्याच्याबरोबर किरकोळ वाद घातला. त्यानंतर फिर्यादी स्वतः टेम्पो घेऊन घरी आले असता आरोपी आणि त्यांच्यात पुन्हा वाद झाला. यावेळी आरोपींनी परिसरात दहशत पसरवत कोयता, दगड आणि लाकडी दांडक्याने तीन वाहनांची तोडफोड केली आहे. या घटने प्रकरणी वसीमला पिंपरी पोलिसांनी ताब्यात घेतले असून इतर आरोपींचा शोध सुरू आहे.
हेही वाचा- एन्काऊंटरच्या समर्थनात महिलांच्या सुरक्षेच्या उणिवा झाकल्या जाऊ नयेत - नीलम गोऱ्हे