पुणे - महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने हिसकावणाऱ्या पदवीधर सराईत गुन्हेगाराला पोलिसांनी जेरबंद केले. समीर श्रीकांत नान्नजकर (वय-४६) अस अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याच्याकडून ८ लाख ४८ हजार रुपयांचे २३ तोळे सोन्याचे दागिने हस्तगत करण्यात आले आहेत. त्याच्याकडून १० गुन्हे उघडकीस आणण्यात पोलिसांना यश आले आहे. पोलिसांपासून लपण्यासाठी आरोपी श्रीकांतने स्वतः चे नाव बदलून विनायक श्रीकांत मान्नजकर असे ठेवले होते. त्यांने बनावट आधार कार्ड देखील तयार केले होते, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सराईत गुन्हेगार श्रीकांत हा गेल्या काही महिन्यांपासून पुण्यातील एका हॉटेलमध्ये काम करतो आहे. त्याचे शिक्षण पदवीपर्यंत झाले असून अनेक गुन्ह्यांमध्ये त्याचा सहभाग आहे. महिल्यांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने हिसकावत असे. त्याच्यावर आर्म ऍक्ट आणि वाहन चोरीचे गुन्हे दाखल आहेत. दरम्यान, गुन्हे शाखा युनिट एकचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक उत्तम तांगडे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू असताना पोलीस कर्मचारी गणेश सावंत यांना माहिती मिळाली की आरोपी श्रीकांत हा भोसरी येथे आहे. त्यानुसार सापळा रचून आरोपीला ताब्यात घेण्यात आले.
सराईत गुन्हेगार श्रीकांतला न्यायलयात हजर करून आज पर्यन्त पोलीस कस्टडी घेण्यात आली. त्याच्याकडे अधिक चौकशी केली असता. एका साथीदारासह दुचाकीवरून येऊन पायी चालणाऱ्या महिल्यांच्या गळ्यातील सोनसाखळी हिसकावत असे अशी कबुली त्याने पोलिसांना दिली. त्याने हिसकावलेले काही सोन्याचे दागिने ओळखीच्या सोनाराला आई आजारी असल्याचा बहाणा करून विकले, तर काही गहाण ठेवले होते. ही कामगिरी गुन्हे शाखा युनिट एकचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक उत्तम तांगडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश पाटील, पोलीस उपनिरीक्षक काळूराम लांडगे, पोलीस कर्मचारी रवींद्र राठोड, रविंद्र गावंडे, आप्पा लांडे, बाळू कोकाटे, अमित गायकवाड, मनोजकुमार कमले, अंजनराव सोडगिर, मारुती जायभाई, सचिन मोरे, प्रवीण पाटील, विजय मोरे, प्रमोद गर्जे, विशाल भोईर, गणेश सावंत आणि तानाजी पानसरे यांच्या पथकाने केली.