पुणे - एक वेळचा भेळीचा नाश्ता, कपभर चहा आणि जोडीला शंभर रुपये मानधन मिळालेला केंद्र सरकारच्या 'मी लाभार्थी' या जाहिरातीतील शेतकरी संकटात सापडला आहे. मोठ्या कष्टाने आणि खर्च करून लावलेला बटाटा पाण्यात सडून चालला आहे. चिखल तुडवत एकेक बटाटा वेचण्याचे काम हा 'लाभार्थी' शेतकरी करत आहे. गोविंद जैद असे या शेतकऱ्याचे नाव असून या शेतकऱ्याच्या जाहिरातीच्या जोरावर मते मिळवणाऱ्यांचे मात्र, या शेतकऱ्याचे काहीही घेणे-देणे नसल्याचे दिसत आहे.
सातगाव पठार भागामध्ये गेल्या पंधरा दिवसांपासून जोरदार पावसाचे सत्र सुरू आहे. यामुळे शेतातील काढणीला आलेले बटाटा पीक पाण्यात सडू लागले आहे. मोठे आर्थिक नुकसान झाल्याने आता जगायचे कसे? खायचे काय? असा प्रश्न गोविंद जैद यांनी सरकारला विचारला आहे.
'मी लाभार्थी' या जाहिरातीच्या माध्यमातून गोविंद जैद हे संपूर्ण देशात झळकले. पुणे-नाशिक महामार्गावरील पेठ येथे जात असताना काही तरुण गोविंद जैद यांना भेटले होते. त्यावेळी तरुणांनी चहा-नाष्टा देत त्यांची विचारपूस केली. गोविंद यांना कुठलीही कल्पना न देता त्यांचे फोटो काढण्यात आले व छायाचित्रणही करण्यात आले. याचाच वापर जाहिरातीत करण्यात आला. या जाहिरातीत गोविंद जैद हसऱ्या चेहर्याने मी लाभार्थी असल्याचे सांगत होते. मात्र, त्यांच्या कुटुंबाची खरी परिस्थिती आणि शेताची वाताहत कुणीही मांडली नाही.