पुणे - कोरोनावरील लस कोवॅक्सिनच्या उत्पादनासाठी भारत बायोटेकच्या प्लान्टला पुण्यात तातडीने जागा उपलब्ध करुन देण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत, अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले आहेत. दौंड उपजिल्हा रुग्णालयाच्या विस्तारीत डेडिकेटेड कोविड सेंटरचे उद्घाटन अजित पवार यांनी मंत्रालयातील उपमुख्यमंत्री कार्यालयाच्या समिती सभागृहातून ऑनलाईन पद्धतीने केले. त्यावेळी ते बोलत होते.
भारत बायोटेक कंपनीने पुण्यातील मांजरी परिसरात असलेल्या 12 हेक्टर जागेवरील पूर्णपणे यंत्रणा कार्यान्वित असलेल्या इंटरव्हिट इंडिया प्रा. लि. कंपनीचा प्लांट हस्तांतरित केला होता. मात्र, त्यात अडचणी आल्याने हे प्रकरण मुंबई उच्च न्यायालयात प्रकरण गेले होते. याबाबत सुनावणी होऊन मुंबई उच्च न्यायालयाने राज्य सरकारला भारत बायोटेकला लस उत्पादन करण्यासाठी जमीन देण्याचे आदेश दिले. त्यानुसार उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निर्देश दिले असल्याचे स्पष्ट केले.
लसीकरणासाठी आवश्यक निधीची तरतूद -
कोरोना संकटावर मात करण्यासाठी डॉक्टर, नर्सेस यांच्यासह राज्याची आरोग्य यंत्रणा सर्वशक्तिनिशी लढत आहे. ऑक्सिजन, रेमडिसिव्हिर औषधांचा पुरवठा सुरळीत रहावे तसेच सर्व रुग्णांना आवश्यक उपचार मिळण्यासाठी नियोजन करण्यात आले आहे. कोरोनाला हरविण्यासाठी राज्यातील प्रत्येक नागरिकाला लस देण्याची सरकारची भूमिका आहे. त्यासाठी आवश्यक निधीची तरतूद करण्यात आली आहे, असे अजित पवार म्हणाले. कोरोना प्रतिबंधक लसीकरण वेगाने पूर्ण करण्यासाठी राज्य शासनाच्यावतीने संपूर्ण नियोजन करण्यात आले आहे. लसीकरणासाठी आवश्यक निधी उपलब्ध आहे. भारत बायोटेक कंपनीच्या प्लान्टला पुण्यात जागा उपलब्ध करून देण्याचे निर्देश पुणे जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत. त्यानुसार नियोजन सुरू आहे. ते कामही तातडीने मार्गी लागेल, असे अजित पवार यांनी सांगितले.
हेही वाचा - महाराष्ट्रात कोव्हॅक्सिनच्या निर्मितीला ताबडतोब परवानगी द्या; मुंबई उच्च न्यायालयाचे आदेश