पुणे - राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी किल्ले शिवनेरीला भेट दिली. गडाच्या पायथ्यापासून कोश्यारी यांनी पायी चालत गड सर केला. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मस्थळावर जाऊन राजमाता जिजाऊ व महाराजांचे राज्यपालांनी दर्शन घेतले. त्यांच्या सोबत यावेळ जुन्नरचे आमदार अतुल बेनके उपस्थितीत होते.
गेल्या वीस वर्षात प्रथमच राज्यपाल किल्ले शिवनेरीवर येत असल्याने शिवभक्तांमध्ये उत्साहाचे वातावरण होते. मात्र, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मर्यादित लोकांनाच गडावर प्रवेश देण्यात आला होता. राज्यपाल सकाळी 11 वाजता शिवनेरी गडाच्या पायथ्याशी आले. त्यानंतर पायी प्रवास करत गडाच्या पहिल्या दरवाजापासून संपूर्ण किल्ल्याची त्यांनी पाहणी केली. वनविभागाच्या माध्यमातून किल्ल्यावर सुरू असलेल्या विकास कामांचीही त्यांनी पाहणी केली. त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जन्मस्थळावर जाऊन राजमाता जिजाऊ व छत्रपती शिवाजी महाराजांना पुष्पहार अर्पण करून दर्शन घेतले.
राज्यपालांच्या किल्ले शिवनेरी दौऱयाला खूप महत्त्व आहे. गड-किल्ले संवर्धन व किल्ले शिवनेरीवर सुरू असलेली विकासकामे जलद गतीने होण्यासाठी आणखी निधी उपलब्ध करुन देण्याची मागणी शिवभक्तांनी, राज्यपालांकडे केली. आपण लवकरात लवकर या प्रकरणात लक्ष घालू असे आश्वासन राज्यपालांनी दिले.