बारामती - बारामती शहरातील फलटण रस्त्यावर असणाऱ्या भंगाराच्या गोदामाला आज सकाळी दहाच्या सुमारास अचानक आग लागली. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवित हानी नसल्याचे वृत्त आहे. मात्र, गोदामात साठवून ठेवलेले भंगार जळून खाक झाले आहे.
फलटण रस्त्यावरील मुल्लावस्ती येथील गोदामाला आज सकाळी दहाच्या सुमारास अचानक प्रचंड मोठी आग लागली. आगीसह धुराचे मोठमोठे लोट दूरवरून दिसून येत होते. अचानक लागलेल्या प्रचंड आगीमुळे परिसरात घबराट पसरली. दरम्यान ही आग विझविण्यासाठी बारामती नगरपालिकेच्या अग्निशमन दलाची वाहने घटनास्थळी दाखल झाले आहे. आग आटोक्यात आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत. आगीत साठवून ठेवलेले भंगार जळून खाक झाल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. मात्र, ही आग कशाने लागली अद्याप समजू शकले नाही.