पुणे - शहरातील एका लाकडी फर्निचरचे गोडाऊनला भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. ही घटना आज (रविवारी) पहाटे तीन वाजताच्या सुमारास उंड्री-पिसोळी परिसरात घडली. पुणे महापालिका आणि पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण अग्निशमन दलाच्या आठ फायर गाड्यांनी एक तासाच्या अथक प्रयत्नानंतर आगीवर नियंत्रण मिळवले आहे.
कोंढवा फायर स्टेशनचे स्टेशन अधिकारी प्रकाश गोरे यांनी दिलेल्या माहितीनुसार, उंड्री येथे ईश्वर कड यांच्या मालकीचे ‘हॅशवूड’ हे लाकडी फर्निचरचे 4000 चौरस फुटांचे मोठे गोडाऊन आहे. या गोडाऊनला आग लागल्याची मााहिती पुणे महापालिकेच्या अग्निशमन दलास पहाटे 3 वाजून 50 मिनिटांनी मिळाली. यानंतर प्रकाश गोरे हे तीन फायरगाड्या आणि दोन बंबांसह घटनास्थळी पोहचले. मात्र, तोपर्यंत आगीने रौद्ररुप धारण केले होते.
हेही वाचा - COVID 19 : राज्यात कोरोनाचे 9 नवीन रुग्ण; एकूण बाधितांचा आकडा 26 वर
आग लागलेले गोदाम सुमारे चार हजार चौरसफूट क्षेत्राचे असल्याने चारही बाजूने पाणी मारणे आवश्यक होते. गोरे यांनी पीएमआरडी अग्निशमन दलाशी संपर्क साधून तातडीने आणखी मदत मागवून घेतली आणि 20 जवानांच्या मदतीने आगीवर नियंत्रण मिळवले. या भीषण आगीत लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. गोदामात लाकूड, फोम, कागदपत्रे असे साहित्य असल्याने आग लगेच भडकली. आग एवढी भीषण होती की गोदामाचे लोखंडी शेड देखील त्यात वितळून गेले. खूप मोठे नुकसान झाल्याचे त्यांनी सांगितले.