पुणे - शहरातील खासगी रुग्णालयातील डॉक्टर आणि परिचारकांना मेस्मा लावण्याचा निर्णय हा खेददायक आहे. आम्हाला विश्वासात न घेता, चर्चा न करता हा निर्णय घेतल्याने हा आमच्यावरील अन्याय आहे, असा आरोप इंडियन मेडिकल असोसिएशनच्या वतीने करण्यात आला आहे. पुण्यात डॉक्टरांबरोबर कोणत्याही प्रकारची चर्चा झाली नाही असे आयएमएचे म्हणणे आहे.
मुंबईमध्ये 55 वर्षीय डॉक्टरांना आणि त्याचबरोबर गरोदर आणि एक वर्षाचा बाळ असलेल्या डॉक्टरांना सवलत देण्यात आली होती. मात्र, पुण्यात अपमानास्पद आदेश काढण्यात आले. कुठलीही चर्चा केली नसल्याचे इंडियन मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष डॉक्टर अविनाश भोंडवे यांनी सांगितले आहे. एकीकडे कोरोनाचा प्रादुर्भाव सुरू झाल्यापासून इंडियन मेडिकल असोसिएशनचे सर्व सहकारी अहोरात्र काम करत आहे. मात्र, सरकार आणि प्रशासनाकडून येणाऱ्या नोटीस आणि आदेश अत्यंत अपमानजनक आहेत. डॉक्टरांचे रजिस्ट्रेशन रद्द करुन कारवाई करू, असाही इशारा यापूर्वी देण्यात आला. यासंदर्भात डॉक्टरांशी चर्चा करून समन्वयातून तोडगा काढणे आवश्यक आहे. त्यांच्या अडचणी समजावून घेणे गरजेचे आहे आणि त्यानंतर जर काम झाले नाही तर मग नोटीस बजावावी, असेही अध्यक्ष भोंडवे म्हणाले.