पुणे - एकीकडे मुलगी वाचवा, देश वाचेल असे संदेश दिले जातात, तर दुसरीकडे आजही स्त्री जन्माचा तिरस्कार केला जातो. राजगुरुनगर येथे राहणाऱ्या थिगळे कुटुंबाने मात्र या समाजासमोर वेगळा आदर्श ठेवला आहे. थिगळे कुटुंबात जन्म घेतलेल्या मुलीचे स्वागत त्यांनी वाजत-गाजत केले आहे.
खेड तालुक्यात गेल्या दोन महिन्यात चार वेगवेगळ्या घटनांमधुन नुकत्याच जन्मलेल्या मुलींना नकोशी म्हणुन बेवारस सोडुन दिले. याच खेड तालुक्यात नकोशी होत चाललेल्या मुलीच्या जन्माचे स्वागत करून आज थिगळे कुटुंबातील 'शांभवी' मुलीचा लक्ष्मीच्या पावलांनी घरात प्रवेश झाला.
राजगुरुनगर येथे रहाणाऱ्या थिगळे कुटुंबात ५० वर्षानंतर मुलीने जन्म घेतल्याने कुटुंबीय आनंदी आहेत. त्यामुळे थिगळे कुटुंबीयांनी तिच्या जन्माचे वाजत गाजत, कुटुंबातील महिला फुगडी खेळत स्वागत करण्यात आले. राजगुरुनगर येथील समीर व निलिमा थिगळे या दाम्पत्याला मुलगी झाली. तिचे शांभवी नावाने नामकरण करण्यात आले आहे.