पुणे - छत्रपती शिवाजी महाराज यांच्या १७ ऑगस्ट १६६६ रोजी झालेल्या आग्राहून सुटकेच्या स्मरणार्थ आग्रा ते राजगड अशी गरूडझेप नावाची मोहीम हाती घेण्यात आली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या दरबारातील सरनौबत नरवीर पिलाजी गोळे यांचे चौदावे वंशज अॅडव्होकेट मारुती आबा गोळे यांच्या नेतृत्वाखाली ही मोहीम राबविण्यात आली आहे. १७ ऑगस्टला सकाळी साडेसात वाजता आग्र्यातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास अभिषेक करण्यात आला. यावेळी स्थानिक आमदार योगेंद्र उपाध्याय व इतिहास संशोधक डॉ. सुमन आनंद यांच्या हस्ते राजगडाच्या मातीचे पूजन करण्यात आले आणि तेथून शिवज्योत प्रज्वलित करत गरुडझेप मोहिमेचा प्रारंभ झाला. या मोहिमेत अनेक शिवप्रेमी मावळ्यांनी सहभाग घेतला असून ही मोहीम आज(रविवारी 29 ऑगस्ट) राजगडावर दाखल होत आहे.
महाराजांच्या या पराक्रमाचे स्मरण करण्यासाठी शिवज्योत घेऊन निघालेले या मोहिमेतील शिलेदार तब्बल 1350 किलोमीटरचा टप्पा पार करून आज राजगडावर दाखल होत आहेत. मारुती बाबा गोळे यांनी या मोहिमेचे नेतृत्व केले आहे. या मोहिमेची माहिती सांगत असताना सरनौबत योगेश गोळे म्हणाले की, महाराजांच्या आग्र्याऱ्याहून झालेल्या सुटकेला ३५५ वर्ष पूर्ण होत आहेत. '३५५ वर्ष होऊनही छत्रपती शिवाजी महाराज यांचा धगधगता इतिहास मावळ्यांनी जागविला आहे. बाराशे किलोमीटर अंतर धावून त्यांनी महाराजांच्या प्रति असणाऱ्या जिव्हाळ्याचे दर्शन उन वारा पाऊस यांची तमा न बाळगता दाखवून दिले. आजही छत्रपतींचा खरा मावळा महाराजांनी दाखवून दिलेल्या वाटेवर चालतो आहे, याचा आनंद होतो आहे. गरुडझेप मोहिमेतील सहभागी मावळ्याचे आणि आमचे मार्गदर्शक मारुतीआबा गोळे यांचे मनापासून अभिनंदन करतो, अशी प्रतिक्रिया सरनौबत योगेश गोळे यांनी यावेळी दिली.
साधारण बाराशे किलोमीटरचे अंतर पार करून ही गरुडझेप मोहीम आज राजगडावर पोहोचणार आहे. त्या नंतर, अभिषेक व स्वागत समारंभ आणि नेत्रचिकित्सा शिबीर होणार असून, अध्यक्षीय भाषणाने कार्यक्रमचा शेवट होणार असल्याचीही माहिती त्यांनी यावेळी दिली. या मोहिमेत सरनौबत पिलाजी गोळे यांचे चौदावे वंशज अॅडव्होकेट मारुतीआबा गोळे, कान्होजी जेधे यांचे वंशज दिग्विजय जेधे, जाधव घराण्याचे वंशज गणेश जाधव व तानाजी मालुसरे यांचे वंशज महेश मालुसरे यांचेसह एकूण ७२ मावळे सहभागी झाले आहेत.