पुणे - पाच जणांच्या टोळक्याने होमगार्डला बेदम मारहाण केल्याने खळबळ उडाली. ही घटना पिंपरी-चिंचवडमध्ये घडली असून सौरभ साळुंखे असे मारहाण झालेल्या होमगार्डचे नाव आहे. सौरभ हा किरकोळ जखमी झाला असून पाचपैकी काही तरुणांनी मद्यपान केले होते, अशी माहिती पोलीस दलातील सूत्रांनी दिली आहे.
पिंपरी-चिंचवड परिसरातील चिखली येथे अज्ञात पाच जणांचे टोळके एका दुकानाच्या समोर सिगारेट ओढत होते. तेव्हा तेथील महिलेने येथे थांबू नका, असे म्हटले. यावरुन त्या दुकानदाराशी या टोळक्याचा वाद सुरू होता. त्यावेळी सौरभ हा तिथून जात असताना किरकोळ वादविवाद दिसला. त्याने हस्तक्षेप करत विचारणा केली, तेव्हा पाच तरुणांनी त्याला मारहाण करण्यास सुरुवात केली.
या मारहाणीत सौरभ हा किरकोळ जखमी झाला आहे. दुकानदार आणि इतर काही व्यक्तींनी भांडण सोडवले असून तेथील काही बघ्यांनी घटनेचा व्हिडिओ मोबाईलमध्ये कैद केला आहे. चिखली पोलीस ठाण्यात सरकारी कामात अडथळा आणल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात येत आहे. मारहाण करणारे आरोपी अद्याप फरार आहेत.