पुणे - कोरोनाचा प्रभाव ज्याप्रमाणे सर्वसामान्य जनतेवर झाला आहे त्याप्रमाणे विघ्नहर्ता श्री. गणरायाच्या उत्सवावरही कोरोनाचे विघ्न येण्याची दाट शक्यता आहे. लॉकडाऊनमुळे कामगारांचा अभाव आणि मूर्ती तयार करण्यासाठी लागणार्या साहित्यांचा तुटवडा असल्याने शहरातील हजारो मूर्तिकार चिंतेत आहेत.
दरवर्षी गणेशोत्सवासाठी पुण्यात आठ ते दहा लाख मूर्तींची मागणी असते. यापैकी ३० ते ४० टक्के मूर्ती पेणहून आयात केल्या जातात. उर्वरित मूर्ती शहरातीलच कारागीर आणि मूर्तिकार तयार करतात. दरवर्षी उत्सवाच्या ६ ते ८ महिन्या अगोदर मूर्ती तयार करण्याचे काम सुरू होते. यंदा गणेशोत्सव मागच्या वर्षीपेक्षा एक महिना लवकर म्हणजे ऑगस्ट महिन्यातच येणार आहे. त्यामुळे, मूर्तिकार फेब्रुवारी आणि मार्च महिन्यापासूनच मूर्ती तयार करण्याचे काम हाती घेणार होते. मात्र, या काळातच कारोनाचे संकट आल्यामुळे शहरातील हजारो मूर्तिकारांचे काम ठप्प पडले आहे.
कोरोनाच्या भीतीमुळे कामगार गावाकडे निघाले
शेकडो कारागीर कोरोनाच्या भीतीमुळे गावाला निघून गेले आहेत, तसेच मूर्ती तयार करण्यासाठी लागणारे प्लॅस्टर ऑफ पॅरिस, शाडूची माती, रंग, ब्रश यासारख्या साहित्यांचा तुटवडा असल्याने अनेक मूर्तिकारांची कामे ठप्प आहेत. त्यामुळे, अवघ्या तीन महिन्यांवर आलेल्या गणेशोत्सवासाठी घेतलेले ऑर्डर पूर्ण होतील की नाही या काळजीत शहरातील अनेक मूर्तिकार आहेत, अशी माहिती सदाशिव पेठ येथील मूर्तिकार किरण दिलीप जोशी यांनी दिली.
साहित्य नसल्याने कामे अर्धवट
शहरात आठशे ते हजार मूर्तिकार आहेत, ते दरवर्षी किमान पाच ते सहा लाख मूर्ती तयार करतात. यामध्ये शाडू मातीच्या आणि प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या मूर्ती असतात. शाडूच्या मूर्ती तयार करायला, त्यानंतर वाळवायला आणि रंगकाम करायला खूप वेळ लागतो. शहरातील अनेक मूर्तिकारांनी अद्याप कामही सुरू केलेले नाही, ज्यांचा मूर्ती तयार करण्याचा स्टुडिओ आणि घर एकाच ठिकाणी आहे त्यांनी काम सुरू केले असले, तरी कामगार आणि साहित्य नसल्याने त्यांचीही कामे अर्धवट आहेत.
लॉकडाऊन संपण्याची शास्वाती नसल्याने नवीन ऑर्डर स्वीकारली गेली नाही
लॉकडाऊन संपून कामे कधी सुरू होतील याची शाश्वती नसल्याने अनेक मूर्तिकारांनी नवीन ऑर्डरही स्वीकारलेल्या नाहीत. कात्रज येथील मूर्तिकार नीलेश पार्सेकर म्हणाले, शहरातील ८०० ते १००० कुटुंबे मूर्ती तयार करण्याच्या व्यवसायात आहेत. मूर्ती तयार करण्याचा ऑर्डर जर पूर्ण झाला नाही, तर मूर्तिकारांचे किमान ३ ते ५ कोटी रुपयांचे नुकसान होणार आहे. मूर्तिकार कुटुंबांना उदरनिर्वाहासाठी इतर व्यवसाय नाही, त्यामुळे काय करायचे असा सवालही नीलेश पार्सेकर यांनी केला.
तसेच ज्यांचे कारखाने आहे त्यांचे मोठ्या प्रमाणात हाल झाले असून याचा फटका येथील कामगारांना बसत आहे. अशीच परिस्थिती जर पुढे असली तर गणेश उत्सावानिमित्त मूर्ती विक्रीसाठी लागणारी दुकाने लागणार नाहीत. तसेच मूर्तींच्या विक्रीवरही याचा मोठा परिणाम होणार आहे.
हेही वाचा- हिंजवडीमध्ये लॉकडाऊन वाढण्याच्या भीतीने शेकडो कामगार रस्त्यावर?